नाशिकची सुवर्णकन्या अंजनाला राज ठाकरेंची आर्थिक मदत

नाशिकची सुवर्णकन्या धावपटू अंजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 लाख 51 हजारांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे अंजनाला लागेल ती मदत अवश्य करणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2014, 02:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकची सुवर्णकन्या धावपटू अंजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 लाख 51 हजारांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे अंजनाला लागेल ती मदत अवश्य करणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिलीय.
झी 24 तासनं अंजना ठमकेला स्वत:च घर बांधावं लागत असल्याचं वृत्त दाखवलं होतं. त्याची दखल घेत राज ठाकरेंनी अंजनाला 1 लाख 51 हजारांची मदत जाहीर केलीय. त्यामुळे आता अंजना ठमकेला छप्पर मिळणार आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने तसचं कुठलाही लोकप्रतिनिधी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पूर्ण करत नसल्याने अंजनासह तिचं संपूर्ण कुटुंब घर बांधण्याच्या कामाला लागलं होतं.
आता राज ठाकरेंच्या मदतीनंतर अंजना ठमकेला छप्पर मिळणार आहे. मनसेनं मदत जाहीर केली असली तरी देखील सरकारकडून कुठलीही मदत अंजनाला मिळालेली नाही. अंजनाला लागेल ती मदत अवश्य करणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिलीय.
यासंदर्भात कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची माहिती घेण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या असून अंजनाच्या गरजांची पूर्तता आदिवासी विकास खातं करणार असल्याची माहिती पिचड यांनी दिलीय. रविवारी मधुकर पिचड अंजना ठमकेला भेटायला जाणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.