सायना उडविणार लष्कराचं विमान

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलची कमाई करत सायना नेहवालनं इतिहास रचला होता. या विक्रमानंतर सायना एक नवी उंचीही गाठणार आहे. किरण एमके-2 या लढाऊ विमानातून सायनाला उड्डाण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे हवाई दलाकडून सन्मान मिळाल्यानं सायना सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 22, 2012, 11:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलची कमाईक करत सायना नेहवालनं इतिहास रचला होता. या विक्रमानंतर सायना एक नवी उंचीही गाठणार आहे. किरण एमके-2 या लढाऊ विमानातून सायनाला उड्डाण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे हवाई दलाकडून सन्मान मिळाल्यानं सायना सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.
सायना नेहवालकडे भारतीय बॅडमिंटनचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. आपल्या शानदार कामगिरीनं तिनं बॅडमिंटनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये तिनं ब्राँझ मेडल पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. आता, भारताच्या या फुलराणीच्या बॅडमिंटन करिअरला आणखी झळाळी मिळणार आहे. `किरण एमके-2` या लढाऊ विमानातून सायनाला उड्डाण करण्याची नामी संधी चालून आली आहे. आंध्र प्रदेशमधील दिदंडीगुलमधील आयएएफच्या प्रशिक्षण तळावर पुढील आठवड्यात सायना या विमानातून उड्डाण करणार आहे. त्याचप्रमाणे सायना हवाई दलाच्या ऍकेडमीतील बॅडमिंटनपटूंशी एक फ्रेंडली मॅचही खेळणार आहे. देशाची सेवा करतांना आपलं लक्ष्य गाठण्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते, याची प्रेरणा आयएएफच्या कॅडेट्सना देण्यासाठीच सायनाला बोलवण्यात आल्याचीही चर्चा आहे. ऑलिम्पिकमध्ये देदिप्यमान कामगिरी केल्यानंतर रिहिती स्पोर्टस कंपनीबरोबर तिनं तब्बल 40 कोटींचा करार केला आहे. क्रिकेटपटूंव्यतिरिक्त इतका मोठा करार करणारी सायना पहिली खेळाडू ठरली आहे.
क्रिकेटमध्ये अविस्मरणीय कामगिरी केल्यानंतर सचिन तेंडुलकरला मानद `ग्रुप कॅप्टन` ही पदवी देत हवाईदलानं मास्टर-ब्लास्टरचा गौरव केला होता. तर तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला वर्ल्ड कप जिंकून देणा-या कॅप्टन महेंद्रसिंग धोनीलाही `कॅप्टन` ही मानद पदवी देण्यात आली होती. सचिन आणि धोनीला `सुखोई 30 एमकेआय` या लढाऊ विमानातून उड्डाण करण्याची संधी हवाई दलाने दिली आहे. मात्र, या दोघांनीही यातून अजूनपर्यंत उड्डाण केलेलं नाही. मात्र, सायनाला पुढील आठवड्यात `किरण एमके-2` या लढाऊ विमानातून गगन भरारी घेण्याची नामी संधी आहे.