`प्रेमाचा शेवट असा होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं`

‘मी आणि रिवा एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आमच्या प्रेमाचा शेवट असा होईल, असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता’ असं पिस्टोरिअसनं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 20, 2013, 10:35 AM IST

www.24taas.com, स्वित्झर्लंड
दक्षिण आफ्रिकेचा पॅराऑलिम्पक स्टार धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस सध्या आपल्या मैत्रिणीच्या हत्या करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. जाणून-बुझून त्यानं त्याची गर्लंफ्रेंड रिवा स्टीनकॅंप हिची हत्या केलीय, असा त्याच्यावर आरोप केला जातोय. अशातच पिस्टोरिअसनं पहिल्यांदाच कोर्टात झालेली घटना कथन केलीय. यावेळी ‘मी आणि रिवा एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आमच्या प्रेमाचा शेवट असा होईल, असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता’ असं पिस्टोरिअसनं म्हटलंय.
नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री
‘नेहमीप्रमाणे त्या रात्रीही मी माझं ‘९ एमएम’ पिस्तूल माझ्या उशाशी ठेवलं होतं. पहाट उजाडण्याआधी काही तास गर्मी जास्तच वाटत होती, त्यामुळे मी बाल्कनीमध्ये हवा खाण्यासाठी गेलो. त्यावेळी मी प्रोस्थेटिक लिंब परिधान केलं नव्हतं. आणि अशावेळी अचानक मला बाथरुममध्ये कुणीतरी असल्यासारखं वाटलं. मला माहीत होतं, की बाथरुमच्या खिडक्या उघड्या आहेत आणि बाजुलाच पायऱ्या आहेत. त्यामुळे मला विश्वास पटला की होय, कुणीतरी नक्कीच माझ्या घरात घुसलंय’.
‘मी जोरात ओरडलो की, घरात जे कुणीही घुसण्याचा प्रयत्न करतंय त्यानं समोर यावं. बरोबरच, मी रिवालाही आवाज देत होतो की घरात कुणीतरी घुसलंय, पोलिसांना फोन कर... मला वाटत होतं की रिवा बेडवर झोपलेली आहे. मी खूप काळजीत होतो... मला स्वत:ला आणि रिवाला वाचवायचं होतं...’

‘एव्हाना घरात कुणीतरी आहे याबद्दल माझी खात्री पटली होती. त्यामुळे मी लगेचच पिस्तूल उचलून त्यातून बाथरूमच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. पण, त्यानंतर जेव्हा मी बेडरुममध्ये गेलो तेव्हा रिवा तिथं नव्हतीच... आणि मी काहीतरी खूप मोठी चूक करून बसलोय, हे माझ्या लक्षात आलं. लगोलग मी बाथरुमच्या दिशेनं गेलो तर तिथं रिवा रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती पण तेव्हा ती जिवंत होती.’
‘मी लगेचच अँम्ब्युलन्सला बोलावलं. पण, तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. रिवानं माझ्या हातातचं आपला प्राण सोडला. तेव्हा माझी काय अवस्था होती, मी व्यक्त करू शकत नाही. माझ्यामुळे रिवा आणि तिच्या कुटुंबीयांवर काय प्रसंग ओढवलाय, याबद्दल विचार करतानाही माझा थरकाप उडतोय’ असं म्हणत पिस्टोरिअसनं एवढ्या दिवस कायम ठेवलेलं आपलं मौन सोडलं.
जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहानं साजरा होत असताना म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी पिस्टोरिअसनं रिवावर गोळ्या झाडल्या होत्या.