पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिष्ठेची लढत

महापालिका निवडणूकांच्या उमेदवारांची अजून घोषणा झाली नसली तरी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापौर योगेश बहल आणि यशवंत भोसले या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील संभाव्य लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Updated: Jan 24, 2012, 11:04 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पुणे

 

महापालिका निवडणूकांच्या उमेदवारांची अजून घोषणा झाली नसली तरी  पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापौर योगेश बहल आणि यशवंत भोसले या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील संभाव्य लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे. महापौरांचा पराभव करण्याच्या उद्देशांनं यशवंत भोसले मैदानात उतरल्यानं महापौरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

पिंपरी चिंचवडमधला संत तुकारामनगर प्रभाग सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. बदलेल्या प्रभाग रचनेमुळं महापौर योगेश बहल आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे यशवंत भोसले या दोघांचे वॉर्ड एकत्र झाले आहेत.  महापौर आणि यशवंत भोसले यांच्यातील संभाव्य लढत जवळजवळ पक्की झाली आहे. त्यामुळे दोघेही हा वॉर्ड अक्षरशः पिंजून काढत आहेत. जनतेच्या केलेल्या कामांमुळे निवडून येऊ असा दावा यशवंत भोसले करत आहेत.

तर ही लढत एकतर्फी आहे कारण यशवंत भोसले हा आपल्या दृष्टीने गौण असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. परस्परांचे हाडवैरी असलेल्या आणि एकमेकांना राजकारणातून संपवण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या महापौर आणि यशवंत भोसले दोघांनाही जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. गेली दोन वर्ष महापौर पदाचा कार्यभार असलेल्या बहल यांच्यासाठी मात्र  ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.