प्रसिद्ध निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांचं निधन

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, August 8, 2013 - 09:29

www.24taas.com , झी मीडिया, नाशिक
प्रसिद्ध निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांचं आज पहाटे २.४५ वाजता निधन झालं. नाशिकच्या सोमवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. किडनी, ब्लड प्रेशर आणि हार्टच्या आजारानं ते ग्रस्त होते. त्यांना नुकतंच इथल्या सोपान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
जलरंगातील लॅण्डस्केप्स आणि स्केचेस हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी लॅण्डस्केप्स काढलीत. शिवाय त्यासाठी वेगवेगळे विषय शोधायला त्यांनी भारतभर भ्रमणही केलं होतं.
कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबात १९३५ मध्ये शिवाजी तुपे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची प्रचंड आवड होती. घरातच त्यांच्यावर चित्रकलेचे संस्कार झाले. त्यांनी १९५७ मध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं.

चित्रनिमिर्तीसाठी त्यांनी जलरंगाशिवाय ओपेक, ऑइल, अॅक्रॅलिक, पेन आणि शाई अशा माध्यमांचाही वापर केला. परंपरा आणि नाविन्यता या दोन्ही गोष्टींचा संगम त्यांच्या चित्रनिर्मितीमध्ये होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013 - 09:29
comments powered by Disqus