शरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 13, 2013, 12:02 PM IST

www.24taas.com, पुणे
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांच्यावर गुन्हांची नोंद करण्यात आली आहे का, अशा आशयाचे एक पत्र दिल्ली पोलिसांकडून पुणे पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुण्यातील पोलिसांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. दिल्ली पोलिसांच्या उपायुक्त कार्यालयातून ९ मार्च रोजी पुणे पोलिसांना एक फॅक्स (जा.क्र. २१३९/१०-१/एस.र्इ.सी. दि. ०९/०३/२०१३ ) आला आहे.

श्री. शरद गोविंद पवार, कृषीमंत्री, रा. बारामती यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबतची माहिती सद्यस्थितीसह पीसीबी कार्यालयात तात्काळ पाठवावी. तसेच तसा अहवाल पाठवावा, असे या पत्रात म्हटले आहे. पोलीस उपायुक्त, गुन्हे (आर्थिक व सायबर) यांच्या आदेशान्वये, हे पत्र पुण्यात धाडण्यात आले आहे.
पत्ररूपी आदेश प्राप्त झाल्यानंतर पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एकच धावपळ उडाली. पुणे पोलीस आयुक्तालयातून सर्व पोलीस ठाण्यांना पवार यांच्याबद्दलची माहिती तत्काळ पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.