PMPMLच्या उधळपट्टीमुळे तिकिट दरवाढीची शक्यता!

येत्या काही काळात पुणेकरांवर पुन्हा पीएमपीएलच्या तिकीट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. कारण पीएमपीएल पैशांची बचत करण्याऐवजी उधळपट्टीच करतेय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 5, 2013, 06:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
येत्या काही काळात पुणेकरांवर पुन्हा पीएमपीएलच्या तिकीट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. कारण पीएमपीएल पैशांची बचत करण्याऐवजी उधळपट्टीच करतेय. पुणेकरांच्या खिशातल्या पैशांचा कसा चुराडा चाललाय, त्याचा हा रिपोर्ट.
डिझेलची घाऊक खरेदी करणा-यांना डिझेलच्या दरात सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्याला आता चार महिने झाले. परिणामी घाऊक खरेदी करणा-यांना डिझेलच्या एका लिटरसाठी ६५ रुपये मोजावे लागले. तर, पेट्रोल पंपांवर हाच दर ५३ रुपये होता. त्यामुळे एसटी, बेस्ट बसेसनी खासगी पंपांवर डिझेल भरायला सुरुवात केली. पुण्यातल्या पीएमपीएलला मात्र हे शहाणपण सुचलं नाही. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या चार महिन्यांत साडे सात कोटींचा भुर्दंड पीएमपीएलला बसलाय. असाच प्रकार पीएमपीएलनं भाडे तत्वावर घेतलेल्या खाजगी गाड्यांबाबतही होतोय.
डिझेलचा दर एक रुपयाने वाढला, तर भाडे तत्वावरच्या गाड्यांना प्रती किलोमीटर ३० पैसे वाढवून दिले जातात. पीएमपीएलनं तर गेल्या चार महिन्यांपासून १० ते १२ रुपये एवढ्या जादा दराने डिझेलची खरेदी केली. त्यानुसार भाडेतत्वावरच्या एका गाडीला एका किलोमीटरला सरासरी साडे तीन रुपये एवढा दर वाढवून देण्यात आलाय. अशाप्रकारे भाडेतत्वावरच्या २७२ गाड्यांना गेल्या चार महिन्यांत पीएमपीएलनं १ कोटी ७३ लाख रुपये जास्त मोजले आहेत. ही उधळपट्टी आणखी किमान दीड महिना चालणार असल्याचं, पीएमपीएलचं म्हणणं आहे.
पेट्रोलपंपावर डिझेल भरण्याचा निर्णय घेतला तर कोट्यवधींची उधळपट्टी वाचू शकते. मात्र पीएमपीएलला हा निर्णय घ्यायला जमलेलं नाही. आणि यापुढेही निर्णय घेण्याची पीएमपीएलची तयरी दिसत नाही. त्यांचा हवाला आहे तो कोर्टवर. त्यामुळे पुणेकरांवर पुन्हा एकदा तिकीट दरवाढीची कु-हाड कोसळली तर नवल वाटायला नको...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.