राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे; मुख्यमंत्र्यांवर दबाव?

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 9, 2013 - 22:29

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पिंपरी-चिंडवडमधल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्या चांगलाच पेटलाय. पुणे आणि पिंपरीमधल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामे दिलेत. पिंपरी-चिंचवडमधलं अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा कुठलाही निर्णय न झाल्यानं या आमदारांनी राजीनामे दिलेत.
विलास लांडे, बापूसाहेब पठारे, लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केलेत. आमदारांच्या राजीनाम्यापाठोपाठ आता महापौरही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. तर ४० नगरसेवकांनी महापौरांकडे राजीनामे सोपवले आहेत. नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चिघळलाय.
मंगळवारी याच मुद्द्यावर शिवसेनेचा नागपूरमध्ये मोर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनं आजच दबाव वाढवत हा क्रेडिट गेम सुरू केलाय.

काय आहे अनधिकृत बांधकाम प्रकरण?
पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास १ लाख २७ हजार अनधिकृत बांधकामं आहेत. यापैंकी ६६ हजार ५०० बांधकामं पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. ही बांधकामं नियमित करण्याचं विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची आमदारांनी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास राजीनाम्याचा इशारा या आमदारांनी दिला होता. ही बांधकामं नियमित करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं... कार्यवाही मात्र केली नाही, असा आरोप करत आता या आमदारांनी राजीनामे दिलेत. एकप्रकारे, केवळ मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013 - 22:29
comments powered by Disqus