डॉ. दाभोलकरांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराच्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते-कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. मात्र त्याआधी साधनाच्या कार्यालयात दाभोलकरांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 20, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराच्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते-कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. मात्र त्याआधी साधनाच्या कार्यालयात दाभोलकरांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नरेंद्र दाभोलकरांची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर दाभोळकरांची हत्या गृहखातं पर्यायानं सरकारला कमीपणा आणणारी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलीय.तसंच हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलंय.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात दाभोलकरांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलाजवळ ही हत्या करण्यात आलीय. सकाळी साडेसातच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून त्य़ांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. एकूण चार राऊंड फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्यातील दोन गोळ्या त्यांच्या शरीराच्या आरपार गेल्या आणि त्यात त्यांचा करूण अंत झाला.
हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. देशभरातून पुरोगामित्वाची हत्या झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त होतेयं. मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील याच बरोबर अनेक राजकिय नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केलायं. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेलयं. त्यांच्या जाण्यानं अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीची आणि महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.