आर आरss आबा; बघा तुमचे पोलीस काय करतायत!

रस्ते बांधणी आणि देखभालीच्या मोबदल्यात टोलवसूल केला जातो, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, अहमदनगरमध्ये चक्क पोलिसांनीच ‘टोलनाका’ सुरु केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 22, 2013, 11:40 AM IST

www.24taas.com, अहमदनगर
रस्ते बांधणी आणि देखभालीच्या मोबदल्यात टोलवसूल केला जातो, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, अहमदनगरमध्ये चक्क पोलिसांनीच ‘टोलनाका’ सुरु केलाय.
अहमदनगरच्या हायवेवर पोलीस ट्रक चालकांकडून अवैध वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एव्हढंच नाही तर या धंद्याला पोलिसांनी अधिकृत स्वरुपही दिलंय. त्यासाठी या ‘मेहनती’ पोलिसांनी टोल वसुलीचं पावती पुस्तकंही छापली आहेत. इथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक ट्रक चालकाला एका महिन्याचा पास पोलिसांकडून खरेदी करावा लागतोय. या पासासाठी ट्रक चालकांकडून अडिचशे रुपये आणि पोलीस शिपायांना प्रत्येकी पन्नास रुपये द्यावे लागतात. अडीचशे रुपये दिल्यानंतर या ट्रकचालकांना ‘अधिकृतरित्या’ बोगस पावतीही दिली जाते.

अहमदनगर शहरातून जाणाऱ्या या हायवेवरुन रोज लाखो वाहनं जातात. या लाखो वाहन चालकांकडून पोलीस लाखो रुपयांची टोल वसुली करत आहेत. ‘झी २४ तास’च्या कॅमेऱ्यात ही टोलवसुली कैद झालीय. पोलिसांनी सुरु केलेल्या या टोलला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तर नाही ना? अशी चर्चा जोरात सुरु आहे.

याहूनही धक्कादायक बाब अहमदनगरमध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मटक्याचे खुलेआम अड्डे सुरु आहेत. पोलिसांचा या भागात किती वचक आहे हे, मटका खेळणाऱ्यांची गर्दी ओरडून ओरडून सांगते. या परिसरात एक फेरफटका मारलात तरी तुमच्या चटकन लक्षात येईल की, मटका चालक किती खुलेआम मटका घेतात. या मटक्यामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वावरताना दिसतात. मटक्याच्या साथीनं या परिसरात जुगाराचे अड्डेही तेजीत आहेत.
या अड्यांवर ‘झी २४ तास’चा कॅमेरा गेल्यानंतर मात्र एकच धावपळ सुरु झाली. मात्र, पोलीस या भागात कधीच फिरकत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.