महिला तहसीलदाराची धावत्या ट्रकमधून उडी

वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना वाळूतस्करांनी केलेल्या घातकी कटकारस्थानामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वाळू वाहतुकीच्या धावत्या मालमोटारीतून उडी मारावी लागली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 15, 2013, 08:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना वाळूतस्करांनी केलेल्या घातकी कटकारस्थानामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वाळू वाहतुकीच्या धावत्या मालमोटारीतून उडी मारावी लागली.
द. सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे हा प्रसंग ओढवला. तहसीलदार ठोकडे या वाळूतस्करांसाठी `कर्दनकाळ` समजल्या जातात. माळकवठे येथे रात्री वाळूतस्करी रोखण्यासाठी तलाठी भाईजान यांच्याबरोबर गेल्या असता तेथे चोरटी वाळू वाहतूक करणारी मालमोटार आढळून आली. त्या वेळी कारवाईच्या भीतीने मालमोटार चालकांनी धूम ठोकली.
तहसीलदार ठोकडे यांनी मालमोटार ताब्यात घेऊन तलाठी भाईजान यांना चालविण्यास दिली. तथापि, मालमोटारीचा एअर पाइप कापण्यात आला होता. त्यामुळे मालमोटारीचा ब्रेक लागेनासा झाला. तहसीलदार ठोकडे आणि तलाठी भाईजान यांनी मालमोटारीतून उडय़ा टाकल्या. याप्रकरणी मालमोटार चालक आणि मालकांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.