पवारांच्या सूचना डावलून आमदारांचा `दिखाऊपणा` सुरूच...

राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचं राजेशाही थाटात लग्न सोहळे आणि वाढदिवस साजरा करणं सुरूच आहे.

Updated: Feb 16, 2013, 01:52 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई / पिंपरी चिंचवड
राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचं राजेशाही थाटात लग्न सोहळे आणि वाढदिवस साजरा करणं सुरूच आहे.

अशोक गावडेंचा शाही महल
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न चिपळूणमध्ये झालं. या लग्नात करोडो रुपयांची उधळपट्टी झाली... त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाधवांची चांगलीच कानउघडणी केली. पण हा वाद शमण्याआधीच राष्ट्रवादीचेच नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडेंच्या मुलीच्या लग्नातला शाही थाट जनतेला पाहायला मिळाला. अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या गावडेंनी कोट्यवधींची उधळण करत मुलीच्या लग्नात शाही महल उभारला होता

लक्ष्मण जगताप यांचा 'साधा' वाढदिवस
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही उधळपट्टीच्या स्पर्धेत उडी घेत वढदिवसानिमित्तांनं लाखोंचा खर्च केलाय. मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी आपला वाढदिवस शुक्रवारी साजरा केला. शहरातल्या रस्त्यांवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. दुष्काळग्रस्तांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असताना आमदार जगतापांच्या वाढदिवसाला मात्र हजारो लोक जेवणावळीला होते. ही बातमी आल्यानंतर आमदार जगताप यांनी मात्र वाढदिवस साधेपणानेच साजरा करत असल्याचा दावा केला. मैदानावरचे जाहीर कार्यक्रम आणि जेवणावळींची आपल्याला कल्पनाच नव्हती, असा न पटणारा दावा त्यांनी केला.
राजकीय नेत्यांच्या भपकेबाज लग्न समारंभ किंवा वाढदिवसावर होणाऱ्या खर्चाची चौकशी केली जावी, अशी मागणी पुण्यातील सामान्य नागरिकांनी केली आहे.