विनयभंगाला प्रतिकार; मुलीला दिलं पेटवून!

एकतर्फी प्रेमातून मुलीला जाळण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घडलीय. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला पेटवून देण्याचा क्रूरपणा एका नराधमानं केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 7, 2013, 09:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
एकतर्फी प्रेमातून मुलीला जाळण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घडलीय. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला पेटवून देण्याचा क्रूरपणा एका नराधमानं केलाय.
संदीप आडसुरे असं या नराधमाचं नाव आहे. पीडीत मुलगी आंघोळीला गेली असता शेजारीच राहणाऱ्या संदीप मोबाईल घेण्याच्या बहाण्याने या मुलीच्या घरात शिरला. घरात कोणी नसल्याचं पाहून या नराधमाने या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीत मुलगी किंचाळल्याने संदीप घाबरला आणि त्याने मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.
पीडित मुलगी ९० % भाजली असून तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संदीप आडसुरे या आरोपीला ताब्यात घेतलंय.

दरम्यान, या घटनेविरोधात पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. मातंग अत्याचार विरोधी कृती समिती आणि दलित चळवळीतल्या संघटनांनी हे आंदोलन केलं. या मुलीला जाळण्याआधी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. तसंच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केलाय. दोषींना पाठीशी घातलं गेलं तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.