मुलीवर बलात्कार करवून आईनेच विकले 'तमाशा'त

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, October 2, 2013 - 20:15

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
माता न तू... वैरिणी… या शब्दांची प्रचीती देणारी घटना पुण्यात उघडकीस आली. एका आईने पोटच्या मुलीला तमाशा मंडळात विकलं. तिला देह विक्रीच्या बाजारात ढकलून दिलं. अवघ्या बारा वर्षाच्या स्वतःच्या मुलीबरोबर असं निष्ठुरपणे वागणारी ही आई आहे, श्यामल पवार… श्यामल पवार बीड जिल्ह्यातील परळीच्या आहेत. त्यांनी प्रियकराच्या मदतीने मुलीला पुणे जिल्ह्यातील तमाशा केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सोलापूरला सातवीत शिकणारी एक मुलगी सुट्टीत तिच्या गावी येते. एके दिवशी दोन अनोळखी लोक घरी येतात आणि तिच्याच घरी तिच्यावर बलात्कार करतात. त्यानंतर तिला घेऊनही जातात आणि हा सगळा धक्कादायक प्रकार घडत असतो त्या मुलीच्या आईच्या संमतीनं. आईनंच हे सगळं षडयंत्र मुलीच्या विरोधात रचलेलं असतं. त्या मुलीवरची संकटं इथेच संपत नाहीत तर तिच्या आईनं स्वतःच्याच मुलीला चक्क तमाशा केंद्रावर विकलं… तेही एक लाख रुपयांसाठी...
तमाशा केंद्रावर मुलीवर भयानक अत्याचार केले जातात. या नरकयातनांतून सुटण्यासाठी ती सोलापुरातल्या वसतिगृहाच्या अधीक्षक सायरा शेख यांच्याशी संपर्क साधते आणि मदत मागते. अखेर सायरा शेख आणि सीआयडी पोलीस निरीक्षक नजीर शेख यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि दोनच दिवसांपूर्वी या मुलीची चाकणच्या तमाशा केंद्रातून सुटका झाली.
स्वतःच्या मुलीचा सौदा करणा-या आईविरोधात आता गुन्हा दाखल झालाय. तर चाकणमधल्या तमाशा केंद्रातल्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. मुलीची आई आणि एजंट दीपक चक्रधर मात्र फरार आहेत.
मुलीच्या आणि आईच्या नात्याला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार पुण्यनगरीत घडला....पोटच्या पोरीला तमाशा केंद्रात विकणा-या या बाईला आई तरी कसं म्हणायचं....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013 - 20:01
comments powered by Disqus