... तर आपली मांडी कापून द्यावी लागेल - अजित पवार

गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 6, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, सांगली
गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
सांगली महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रणधुमाळीत अजित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या काँग्रेसच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले.
सांगलीतील निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप आपण समजू शकतो पण त्यालाही काही पातळी असली पाहिजे, पातळी सोडणे ही आमची संस्कृती नाही, असा टोलाही माणिकराव ठाकरे यांनी हाणला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या आरोपांचा साधा विषयही निघाला नाही आणि सगळे मांडीला मांडी लावून बसले होते.
अजित पवार आणि आर.आर.पाटील यांनी राणे यांच्यावर आज टीका करताना ते गुन्हेगार असल्याचेच वक्तव्य एकप्रकारे केल्याने राणे शांत कसे बसतील? असे सांगून दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक होईल तेव्हा आम्ही हिशेब विचारू, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे आमचे आर. आर. पाटील म्हणतात. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादीवर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्यांनी काँग्रेसचा पवार यांनी समाचार घेतला. काँग्रसचे अनेक नेते प्रचारासाठी सांगली-मिरजेत आले. मुख्यमंत्रीही आले. त्यांना आम्ही लोकसभेवेळी आमची ताकद दाखवली होती. आता कालपरवा कराडची नगरपालिका त्यांना ताब्यात ठेवता आली नाही. सरकारमध्ये एकत्र काम करायचे म्हणून आम्ही बोलायचे टाळतो, पण त्यांनीच इथं येऊन आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न केला, असे सांगून पवार म्हणाले, चेंबूरच्या टोळीचा इतिहास आजही गृहखात्याकडे आहे. त्यांनी गुन्हेगारीवर बोलावे यासारखा विनोद नाही. आर. आर. पाटील स्वच्छ प्रतिमा असणारे आमचे मंत्री आहेत.
गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन असे विधान त्यांनी केले होते. पण खरे सांगू, या गुन्हेगारी पार्श्वनभूमीच्या उमेदवारामुळे पाळी येईल का माहीत नाही, पण आरआरना दर बुधवारी मांडी कापावी लागेल. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपला इतिहास तपासावा, असे आव्हान देत पवार म्हणाले, काँग्रेसचे सांगलीचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनी कुठे आणि किती जमिनी कशा घेतल्या हे बाहेर काढले तर लय अवघड जाईल. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ हेच चांगले. त्यामुळे काँग्रेसने नैतिकता आम्हाला शिकवू नये.
माणिकरावांना आतमध्ये दुसऱ्या रस्त्याने जावे लागते. त्यांना रात्रंदिवस लाल दिवा मिळण्याची स्वप्ने पडतात, त्यामुळेच ते राष्ट्रवादीवर टीका करतात. यावेळी पवार यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे नेतृत्व नाही, केवळ वक्तृत्व आहे. त्यांना त्यांचा पुतण्या सांभाळता येत नाही, त्यात माझा काय दोष? मी काही घरफोड्या नाही. दाऊदच्या मुसक्या बांधून आणण्याची घोषणा करणाऱ्यांना मुंडेंना दाऊदचा रुमालसुध्दा सापडलेला नाही.
# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.