पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 10, 2014, 08:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर/बीड
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.
कर्जत तालुक्याची पाहणी करून अजित पवार शेवगाव तालुक्यात येताच संतप्त मनसे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या गाडीला घेराव घातला. तसंच घोषणाबाजी केली. यावेळी गाड्या पुढे जायला लागल्यावर कार्यकर्ते संतप्त झाले आणि कार्यकर्त्यांनी ताफ्यावरच हल्लाबोल केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. या प्रकारामुळे अजित पवार यांनी पुढील नियोजित दौरा रद्द केला.

शरद पवार बीडच्या दौऱ्यावर
बीड जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातली ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन बाधित झालीय. या गारपीटग्रस्त भागास केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज भेट दिली.
सकाळी अंबाजोगाई इथं पिंपळा धोयगुडा आणि परळी तालुक्यातल्या मांडवा, पांगरी, कवडगाव या ठिकाणांना भेट देऊन पीडित शेतकऱ्यांसह चर्चा करून त्यांना दिलासा दिला तसंच लवकरच नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासनही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिलं तर परभणी जिल्ह्यातही शरद पवारांनी भेट देऊन गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.