आजीनं हाणून पाडला नातीचा बालविवाह!

समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अशा काही घटना घडत आहेत. ज्यामुळं आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो? पिंपरी-चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं असाच समाजाचा मागासलेपणा दाखवणारी घटना घडलीय. इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. पण मुलीच्या सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या धाडसानं तो टळला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 28, 2013, 10:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अशा काही घटना घडत आहेत. ज्यामुळं आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो? पिंपरी-चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं असाच समाजाचा मागासलेपणा दाखवणारी घटना घडलीय. इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. पण मुलीच्या सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या धाडसानं तो टळला.

देहुरोडमधल्या विकासनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबातल्या अवघ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं दापोडीतल्या एका २५ वर्षांच्या मुलाबरोबर लग्न ठरविण्यात आलं. दोन्हीकडच्या नातेवाईकांनी लगीनघाई करत लग्नपत्रिका छापून विवाहाचा योग जुळून आणला. या दोघांचा विवाह काल सकाळी अकरा वाजता देहुरोड मधल्या गुरुद्वारामध्ये लावण्याचं ठरलं. आई-वडीलांच्या इच्छेनुसार मुलीला हा विवाह करावा लागणार होता. इच्छा नसताना जबरदस्तीनं होत असलेल्या विवाहाबाबत दोन दिवसांपूर्वी मुलीनं आजीला सांगितलं. तिनं आजीकडे या विवाहापासून वाचविण्याची विनवणी केली.

वयाने लहान असणाऱ्या नातीचा परस्पर होत असलेल्या विवाहाची कुणकुण लागताच आजीने नातीला वाचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आजीनं देहुरोड परीसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली. सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांनी तात्काळ देहुरोड गुरूद्वार गाठलं.
दरम्यान, आजीच्या हालचालींबाबत मुला-मुलींचा नातेवाईकांनाही समजलं होतं. त्यामुळं त्यांनीही ऐनवेळी विवाहस्थळ बदललं. पोलिसांनी चौकशी करत नवं विवाहस्थळ शोधून काढत थेट सोमाटणे मधलं गुरुद्वारा गाठलं. पोलिसांना पाहून मुला-मुलींच्या नातेवाईकांसह सगळेच पाहुणे मंडळी आवाक झाले. पोलिसांनी मुलीच्या आईसह संबधितांना ताब्यात घेतलं. अन् आजीनं अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा हा डावा उधळून लावला. पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत मुलीच्या आणि मुलाच्या नातेवाईकांसह संबधितांना अटक केलीय.

आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या थोड्याशा धाडसामुळंच हा विवाह होता होता राहिला. पण आजही अनेक ठिकाणी अशा घटना घडतायेत. त्यामुळं खरंच समाज बदललाय का? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ