दाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न

निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2013, 03:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.
दाभोलकर यांच्या आंदोलनामुळे ज्या व्यावसायिकांना नुकसान सहन करावं लागलं त्यांनीच दाभोलकर यांची हत्या केली असावी, अशी शक्यता गुन्हे शाखा आणि पोलीस यांनी व्यक्त केलीय. आरोपींच्या तपासासाठी मुंबई, सातारा, नाशिक या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली आहेत. गुन्ह्याच्या तपासात पुणे व मुंबई पोलीस तसेच दहशतवादविरोधी पथकही सहभागी आहेत.

दाभोलकर यांच्या खुनामागे नेमका कुणाचा हात आहे किंवा या घटनेमागची कारणं शोधण्यात पोलिसांना आत्तापर्यंत कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही. पोलिसांनी काही कारणांची अंधारात चाचपणी केली मात्र हाती काहीही लागलं नाही. आता काही ठराविक शक्यतांवर पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांकडे चौकशी केली आहे. त्याच बरोबर कारागृहातील सराईत गुन्हेगारांकडे तपास केला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या आंदोलनामुळे व्यावसायिक नुकसान झाले, त्यांनी ही हत्या घडवून आणली का याचा पोलीस तपास घेत आहेत. पोलिसांकडून अशा काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. पण, याबाबत पोलीस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी तपासाच्या दृष्टिकोनातून अधिक माहिती देणे योग्य नसल्याचे सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.