पुण्यात प्रतिबंधक लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 16, 2013, 02:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
वैभव सुरेश शिंदे या अडीच महिन्याच्या बाळाला १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लसीकरण केले. बाळाच्या दोन्ही मांडीत प्रत्येकी एक आणि हातावर एक इंजेक्शन देऊन लसीकरण केले. त्यानंतर सायंकाळी बाळाला ताप आला. त्यानंतर बाळाची दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास हालचाल होत नसल्याचे बाळाच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर बाळाचे पालक सुरेश किसन शिंदे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भांबार्डे येथे त्या दिवशी एकूण १८ बालकांना बी.सी.जी., डी.पी.टी. आणि पोलिओ, तसेच हिपॅटायसिस लसीकरण करण्यात आले. लशीचा नमुना हिमाचल प्रदेशातील कसौली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.