इंधन भरण्याच्या मापात पाप!

रिक्षाची मीटर्स चेक करणारी यंत्रणा आता मापात पाप करणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न रिक्षाचालक विचारताहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 4, 2013, 06:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
इंधनाच्या टाकीची क्षमता साडेचार किलो असताना पंपाच्या मीटरवर मात्र सव्वापाच किलो गॅस भरल्याचे दर्शवण्यात आलं… शिवाजीनगर मधील सी एन जी पंपावर ग्यास भरण्यासाठी आलेल्या रिक्षाच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यामुळं पुण्यातील रिक्षाचालक आणि सीएनजी पंप चालकांमध्ये वादावादी झाली. रिक्षाची मीटर्स चेक करणारी यंत्रणा आता मापात पाप करणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न रिक्षाचालक विचारताहेत.
संतोष खंडेलवाल यांनी त्यांच्या रिक्षाच्या गॅसची टाकी सकाळी सकाळी फ़ुल्ल करून घेतली. पण गॅस भरून झाल्यानंतर पंपाच्या मीटरवरचं रीडिंग पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या रिक्षामध्ये साडे पाच किलो गॅस भरल्याचं मीटरवर दिसत होतं. प्रत्यक्षात त्यांच्या रिक्षाच्या टाकीची क्षमता साडेचार किलो इतकीच आहे. मग टाकीमध्ये इतका गॅस बसला कसा, आणि तो गेला कुठे असा प्रश्न रिक्षाचालकांना पडलाय. रिक्षामध्ये गॅस भरताना पंपचालकांकडून रिक्षाचालकांची लुट सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
पंपाच्या मीटरवर रीडिंगमध्ये घोळ झाल्याच्या घटना वेळोवेळी समोर आल्यायत. मात्र तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडल्याचा पंपचालकांचा दावा आहे.

पुण्यातले सीएनजी रिक्षाचालक आधीच विविध कारणानी त्रस्त आहेत. शहरात सी एन जी पंपांची कमतरता असल्याने गॅस भरण्यासाठी तासनतास रिक्षांच्या रांगेत उभं राहावं लागतं. त्यात पंपचालकांच्या मनमानीमुळे अनेकदा संघर्षाचे प्रसंग उदभवतात. अशा परिस्थितीत सीएनजी गॅसच्या वितरण व्यवस्थेवर नियंत्रण असणं गरजेचं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.