बलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड

By Aparna Deshpande | Last Updated: Saturday, November 30, 2013 - 17:38

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी मानेला चपलांनी चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित मुलगी एका गारमेंट कंपनीत काम करत होती. चांगल्या पगारची नोकरी मिळवून देतो असं आमिष दाखूवन आरोपी मानेनं तिला आष्टा गावात नेलं. आणि तिथं तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला सोलापूरला नेवून तिचे हात पाय बांधून पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.
नराधम राहुल माने मागील आठ दिवसांपासून या मुलीचं लैंगिक शोषण करीत होता. अखेर सोलापूर मधील ज्या खोलीत तिला डांबून ठेवलं होतं तिथं शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या मोबाईल वरून पिडीत मुलीनं आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी भाजपचे स्थानिक नेत्यांची मदत घेऊन मुलीची सुटका केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, November 30, 2013 - 15:57
comments powered by Disqus