राज ठाकरेंना चारही गुन्ह्यांत जामीन मंजूर!

साताऱ्यात २००८ साली प्रक्षोभक भाषण केल्यामुळे झालेल्या तोडफोडीनंतर दाखल झालेल्या चार गुन्ह्यांवरून आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली.

शुभांगी पालवे | Updated: Aug 8, 2013, 03:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
साताऱ्यात २००८ साली प्रक्षोभक भाषण केल्यामुळे झालेल्या तोडफोडीनंतर दाखल झालेल्या चार गुन्ह्यांवरून आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सातारा जिल्हा न्यालायालात हजर झाले. त्यांच्यासोबत मनसेचे नऊ कार्यकर्तेही न्यायालयात हजर होते. राज ठाकरे आज न्यायालयात येणार, असं समजल्यावर साताऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली. यावेळी न्यायालयाच्याच आवारात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करुन गर्दी करणाऱ्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्याना पांगवावे लागले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००८ केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील अनेक वाहनांची तोडफोड केली होती. या तोडफोडीत काही प्रवासीही जखमी झाले होते. त्यामुळे वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या चार गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते, त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आज राज ठाकरे यांनी सातारा न्यायालयात हजेरी लावली. चार वेगवेगळ्या न्यायाधिशांसमोर त्यांनी हजेरी लावून सर्व चार गु्न्ह्यांमध्ये त्यांना जामीन देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीशांनी त्यांना जामीन दिला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.