एनसीसी ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थाच्या डोक्यात बंदुकीची गोळी

एनसीसी ट्रेनिंग दरम्यान शुटिंग शिकणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर उठलंय. पराग इंगळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. ज्याच्या हातून त्याला गोळी लागली, त्या आमोद घाणेकर या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 6, 2013, 08:46 PM IST

www.24taas.com, पुणे
एनसीसी ट्रेनिंग दरम्यान शुटिंग शिकणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर उठलंय. पराग इंगळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. ज्याच्या हातून त्याला गोळी लागली, त्या आमोद घाणेकर या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली.
लॉयला शाळेत आठवीत शिकणारा पराग पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय. शुटिंगच्या सरावादरम्यान त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागली आहे. सेनापती बापट रोडवरच्या एन सी सी मैदानावर ही घटना घडलीय. या घटनेमुळे परागच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
लॉयला शाळेच्या विद्यार्थ्यांचा शुटिंगचा सराव सुरू होता. त्यांना जमिनीवर झोपून शुटिंग करायला सांगण्यात आलं होतं. आमोद घाणेकर हे त्यांचे प्रशिक्षक होते. या दरम्यान ते स्वत:ही मुलांच्या मागे उभं राहून फायरिंग करत होते. त्याचवेळी त्यांच्या रायफलमधून सुटलेली एक गोळी परागला लागली आणि तो खाली कोसळला. या प्रकरणी आमोद घाणेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना अटकही करण्यात आली आहे.
एनसीसी अधिका-यांमार्फतही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे एका निष्पाप मुलाचा जीव धोक्यात येणं ही निश्चितच चिंतेची बाब आहे.