राज ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक

अहमदनगर जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. नगर जिल्ह्यातील भिंगार गावातील ही घटना आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 26, 2013, 11:12 PM IST

www.24taas.com, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. नगर जिल्ह्यातील भिंगार गावातील ही घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. भगवानगड येथून येत असताना भिंतीमागे लपलेल्या काही जणांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंनी सोलापूर येथील भाषणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली होती. या टीकेचे पडसाद सांगली जिल्ह्यातही पाहायला मिळाले होते. सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं पोस्टर जाळलं होतं. तसंच आज अहमदनगरमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.राज ठाकरे जरी या दगडफेकीतून बचावले असले, तरी या घटनेमुळे अहमदनगरमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. जमावाला हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

यावेळी स्थानिक पोलिसांचं सहकार्य मिळालं नसल्याचं अहमदनगर येथील मनसेचे संपर्क अध्यक्ष संतोष धुरी यांनी म्हटलं आहे. तसंच राज ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक न होता ती पोलिसांच्याच गाडीवर झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच सहकार्य केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. उलट राज ठाकरेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या जमावावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच एक कार्यकर्ता जखमी झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. तसंच, यापुढे राज ठाकरेंनी अशी बेताल आणि बाश्कळ बडबड केली तर त्यांना जशास तसे उत्तर मिळेस, असं आव्हानही राज ठाकरेंना देण्यात आलं आहे.