`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'

मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2013, 01:58 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांनी संप केला, दुकानं बंद ठेवली तरी त्याचा सरकारवर मात्र काहीही परिणाम झाला नाही. उलट ‘एलबीटी’ कराचा मुख्यमंत्र्यांनी समर्थनच केलं. यानंतर व्यापाऱ्यांनी राज ठाकरेंच्या घरचा रस्ता धरला. मंगळवारी, व्यापाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलीय.
यानंतर राज ठाकरेंनी ‘एलबीटी’ संदर्भात आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली नसली तरी ‘तुमचं भांडण सरकारशी आहे, दुकानं बंद करून जनतेला वेठीस धरू नका’ असा सल्ला व्यापाऱ्यांना सल्ला दिलाय. ‘लोकांना जो त्रास होतोय तो अगोदर बंद करा. अशा आंदोलनांमध्ये सरकारला काहीच फरक पडत नाही तर उलट लोकांनाच त्रास होतो. त्यामुळे दुकानं अगोदर सुरू करा’ असे धडेच राज ठाकरेंनी व्यापाऱ्यांना दिलेत. सोबतच मनसेही यापुढे रास्ता रोको किंवा तत्सम आंदोलनांच्या बाबतीत पुनर्विचार करेल, ज्यांमुळे नागरिकांना त्रास होतो, असं राज ठाकरे म्हणालेत.

‘सरकारशी चर्चा करताना एलबीटीला आपला का विरोध आहे? याचा पूर्ण प्लान सरकारसमोर सादर करा... ही बाजू महाराष्ट्राच्या हिताची असेल तर मनसेचा पाठिंबा त्यांना असेलच’ असंही राज ठाकरेंनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिलंय.