'पवारांची साथ सोडली म्हणून झेड सिक्युरिटी काढली'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय.

शुभांगी पालवे | Updated: Oct 10, 2013, 09:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची सुरक्षा आता शिथिल करण्यात आलीय. आठवले यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. आता मात्र त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षेखालील समितीने बुधवारी घेतलाय. त्यामुळे आठवले मात्र नाराज आहेत.
‘पवारांची साथ सोडली म्हणून आपली झेड सुरक्षा काढून घेण्यात आली’ असा घणाघाती आरोप त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांवर केलीय.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय. राज ठाकरे यांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढते दौरे आणि सभा लक्षात घेऊन सरकारनं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली गेलीय. राज ठाकरे यांनी याआधी आपली सुरक्षा व्यवस्था स्वत:हून सरकारला परत केली होती.

झेड सुरक्षा म्हणजे काय?
भारतामध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींना पोलीस आणि स्थानिक सरकारांकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. संबंधीत व्यक्तीला कोणत्या प्रकारचा धोका संभवतो, त्यानुसार ही सुरक्षा प्रदान करण्यात येते. ही सुरक्षा चार श्रेणीमध्ये विभागली जाते, यात झेड प्लस (सर्वोच्च श्रेणी), झेड, वाय आणि एक्स.
* झेड प्लस श्रेणीत ३६ जणांची सुरक्षा प्रदान करण्यात येते.
* झेड श्रेणीत २२ जणांची सुरक्षा प्रदान करण्यात येते.
* वाय श्रेणीत ११ जणांची सुरक्षा प्रदान करण्यात येते.
* एक्स श्रेणीत २ जणांची सुरक्षा प्रदान करण्यात येते.
एसपीजी (विशेष सुरक्षा दल), एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक), आयटीबीपी (इंडो-तिबेटी बॉर्ड पोलीस) आणि सीआरपीएफ( केंद्रीय राखीव पोलीस दल) यांच्याकडे या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. यात व्हीव्हीआयपी/व्हीआयपी/राजकारणी/हायप्रोफाइल सेलिब्रिटी आणि क्रीडापटूंना ही सुरक्षा देण्यात येते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.