'विधानसभेला राज ठाकरे स्वत: निवडणुकीला उभा राहणार'

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंची पहिलीच सभा

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 31, 2014, 09:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत सायन इथं पहिलीच जाहीर सभा घेतली. 'आगामी विधानसभा निवडणुकीत हा राज ठाकरे स्वत: निवडणूक लढवणार', असं म्हणत त्यांनी 'ठाकरे बॉम्ब'च टाकलाय. याचप्रमाणे, आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छाही त्यांनी पहिल्यांदाच जाहीर केलीय. त्यामुळे, ठाकरे कुटुंबीयातील निवडणुक लढवणारे ते पहिलेच सदस्य ठरणार आहेत.
'या मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय... असं म्हणत ज्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना साद घातली ते मी आत्ता तुम्हाच्यासमोर ठेवतोय... येत्या विधानसभा निवडणूकीत हा राज ठाकरे स्वत: निवडणूक लढविणार आहे आणि लोकांनी कौल दिला तर सत्तेचं नेतृत्वही राज ठाकरेच करेन' असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही उचलून दाखवेन, अशाच आशयाचे संकेत दिलेत.
'पराभवातून कसं पुढे यायचं याचं बाळकडू मी लहानपणापासून घेतलंय... ही समोरची गर्दीच सांगतेय मी संपलेलो नाही' असं म्हणत 'मी विधानसभेला मुसंडी मारून दाखवीन' असा विश्वासही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलाय.

मोदींचं केलं कौतूक
या लोकसभा निवडणूकीत मोदींच्या नावावर अनेक जण निवडून आले... या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करता येणंही कठिण आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हणत लोकसभेतील आपल्या पराभवाचं विश्लेषण टाळलं. पण, याचवेळी त्यांनी नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुतीही केली. मोदी उत्तम आणि चांगले निर्णय घेतील, असं म्हणतानाच राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचं अभिनंदनही केलं.

'खळ्ळं फटॅक'चा राज ठाकरेंचा अर्थ...
आपल्याच पक्षातील लोकांना खळ्ळ फटॅकचा अर्थ कळलेला नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या दिखाऊपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. 'वैयक्तिक फायद्यांसाठी खळ्ळ फटॅक नाही... मी सांगतो तेव्हाच खळ्ळ फटॅक व्हायला हवं... जिथे अन्याय होत असेल तिथे लाथ पडलीच पाहिजे' असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिलीय.

नाशिकचं काय...?
'नाशिकबद्द्ल मला अनेक जण विचारतात... तेच तेच प्रश्न करतात... पण, मी जे काही करतोय ते पॅशन म्हणून करतोय... नाशिकची चांगली काम लोकांपर्यंत पोहचली नाहीत... म्हणून मला हे प्रश्न विचारले जातात... नाशिकमधला विकासही तुम्हाला लवकरच दिसेल...' असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिकमधल्या कामगिरीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरलं.
'माझी नाराजी जनतेवर नाही तर माझ्या पदाधिकाऱ्यांवर आहे... आपल्याच पक्षातील काही जण तंगड्या वर करून पडलेत... त्यांना त्यांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवता येत नाही...' असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या पक्षातील नेत्यांना आपली कामं लोकांपर्यंत पोहचवण्याचे आदेशच देऊन टाकलेत.
'माझ्याकडून अपेक्षा आहे तर माझी ठासता कशाला? अपेक्षा असेल तर राजला वेळ द्या' असं म्हणत आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या लोकांनाही त्यांनी फैलावर घेतलंय.

व्हिडिओ पाहा -