सचिन तेंडुलकर फुकटात क्रिकेट खेळलेला नाही - तिवारी

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, November 18, 2013 - 13:46

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला... परंतु या पुरस्कारावर जेडीयूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
‘जेडीयू’चे खासदार शिवानंद तिवारी यांनी हे प्रश्न उपस्थित करताना, करोडो रुपये कमावणाऱ्या खेळाडुला भारतरत्न देण्याची काही एक गरज नाही, असं म्हटलंय.
‘भारतरत्न’ म्हणजे एक मजेशीर खेळ झालाय. आता या पुरस्काराला काही अर्थच उरलेला नाही’ असं म्हणत तिवारी यांनी या पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
सचिन तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरलाय. यावरच प्रश्न निर्माण करत, हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंदच्या नावाचा या पुरस्कारासाठी का विचार करण्यात आला नाही? असं त्यांनी विचारलंय... आणि सचिनबद्दल बोलताना त्यांनी ‘सचिन तेंडुलकर फुकटात क्रिकेट खेळलेला नाही. सचिननं या खेळामधून करोड रुपये कमावलेत’ असंही त्यांनी म्हटलंय.
तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, सचिनला भारतरत्न देण्याची काही एक आवश्यकता नव्हती. क्रिकेटनं देशातील बाकी सर्व क्रीडा प्रकारांना खाऊन टाकलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013 - 13:46
comments powered by Disqus