माफीसाठी प्रयत्न करणार नाही; संजूला अश्रू अनावर

सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आज संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी संवाद साधताना संजयला अश्रू अनावर झाले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 28, 2013, 11:54 AM IST

www.24taas.com, मुंबई
सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आज संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी संवाद साधताना संजयला अश्रू अनावर झाले.
यावेळी आपण कायद्यासमोर शरणागती पत्करणार असल्याचं संजयनं म्हटलंय. त्यानं आपली चूकही कबूल केलीय. ‘माझ्याकडून चूक झाली. पण भारताविरुद्ध कट रचण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो... माफीसाठी प्रयत्न करणार नाही... मी शरणागती पत्करणार’ असं संजयनं म्हटलंय. यावेळी संजय दत्तसोबत प्रिया दत्तही उपस्थित होती.

देश, नागरिकांना आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या सगळ्यांचेच आभार मानताना संजय दत्तला अश्रू अनावर झाले. यावेळी त्यानं बाजुलाच बसून त्याला धीर देणाऱ्या प्रियाच्या खांद्यांचा आधार घेतला. प्रियाच्या गळ्यात पडून तो ढसाढसा रडला.
कोर्टानं शरणागतीसाठी 4 आठवड्याचा वेळ दिलाय. हा वेळ कमी असला तरी या वेळेत अपूर्ण कामं पूर्ण करणार असल्याचं त्यांनं सांगितलं.

‘माझ्या देशावर... माझ्या भारतावर मी प्रेम करतो’ असं म्हणतानाच या शिक्षेमुळे माझ्या कुटुंबाला सर्वात जास्त धक्का बसलाय... त्यामुळे उरलेला जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवणार असल्याचं संजयनं म्हटलं.