...हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न - सानिया मिर्झा

युगुल रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झालेली पहिली-वहिली भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सध्या आपल्या कामगिरीवर खूप खूश आहे. 

Updated: Apr 13, 2015, 01:40 PM IST
...हे तर  प्रत्येक खेळाडूचं स्वप्न - सानिया मिर्झा title=

चार्ल्सटन : युगुल रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झालेली पहिली-वहिली भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सध्या आपल्या कामगिरीवर खूप खूश आहे. 

'नंबर वन'वर दाखल होण्याचं प्रत्येक व्यक्तीचं लहानपणापासूनचं स्वप्न असतं, असं सानियानं म्हटलंय. स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, असं सांगण्याचंही सानिया विसरलेली नाहीय.

आपल्या विजयाचे श्रेय तिनं तिची जोडीदार मार्टिना हिंगिस हिलाही दिलंय. हा विजय मिळवण्यासाठी मार्टिनाशिवाय आणखी उत्तम जोडीदार असूच शकत नाही. जेव्हा आम्ही इथं आलो होतो तेव्हा आमच्या डोक्यात केवळ नंबर वनवर दाखल होण्याचंच स्वप्न होतं... आणि या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तिनं माझी मदत केली. ती खूपच चांगली व्यक्ती आणि शानदार खेळाडू आहे.... आता आम्ही जगातील 'नंबर वन' टीमही बनलो आहोत. यानंतरही आम्ही अनेक टूर्नामेंट जिंकू' असं म्हणत सानियानं आपला आत्मविश्वासही व्यक्त केलाय. 

दरम्यान, टेनिस स्टार सानिया मिर्झा युगूल रँकिंगमध्ये नंबर वनवर दाखल झाल्याबद्दल तिला अनेक हस्तींना ट्विटरवर शुभेच्छा दिल्यात. लिएंडर पेससोबरत नंबर वनवर राहिलेल्या महेश भूपतीनं  'सानिया मिर्झा अव्वल नंबरवर... मला गर्व आहे. खूप मेहनत आणि कुटुंबाच्या त्यागामुळेच हे शक्य झालंय... पुढे आणखीही विजयश्री मिळत राहो' अशा शुभेच्छा दिल्यात. 

तर भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली म्हणतो, 'अगोदर सायना आणि आत्ता सानिया.... भारतीय महिला नंबर वनवर दाखल होऊन आपल्याला गौरव प्राप्त करून देत आहेत'.

रविवारी झालेल्या मॅचनंतर सानिया मिर्झा युगल रँकिंगमध्ये जगभरात नंबर एकची खेळाडू बनलेली पहिली भारतीय महिला टेनिस स्टार ठरलीय. सानियानं हिंगससोबत डब्ल्यूटीए फॅमिली सर्कल कप जिंकला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.