क्रिकेटनंतर आता फुटबॉलवरीही फिक्सिंगचं भूत?

Last Updated: Tuesday, July 1, 2014 - 21:56
क्रिकेटनंतर आता फुटबॉलवरीही फिक्सिंगचं भूत?
फाईल फोटो

नवी दिल्ली : ब्राझिलमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचा सणसणाटी आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे मॅच फिक्सिर विल्सन पेरुमलने एका इंटरव्यूमध्ये हा आरोप केला असून आता कॅमरुनच्या प्लेअर्सची चौकशी करण्यात येईल, असं कॅमरुन फुटबॉल संघटनेने जाहीर केलंय.

ब्युटीफुल गेम असं वर्णन करण्यात येणाऱ्या फुटबॉललादेखील मॅच फिक्सिंगचा विळखा बसलाय. ब्राझिलमध्ये सध्या सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ग्रुप 'ए' मध्ये असलेल्या कॅमरुनच्या सात प्लेअर्सने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप एका कुविख्यात मॅच फिक्सरने केला असल्याचा दावा काही परदेशी वृत्तपत्र आणि मासिकांनी केलाय.

कॅमरुनने लीग राऊंडमध्ये ब्राझिल, मेक्सिको आणि क्रोएशियाविरुद्धच्या आपल्या तिन्ही मॅचेस गमावल्या होत्या. खास करुन क्रोएशियाविरुद्धची मॅच कॅमरुनने 0-4 ने गमावली होती. म्हणूनच या मॅचची चौकशी कॅमरुनच्या नैतिक समितीकडून केली जाणार आहे.

मॅच फिक्सर पेरुमलने दोन मॅचचा निकाल आधीच जाहीर केला होता. याचबरोबर एक खेळाडूला मैदानाबाहेर काढण्यात येईल, असाही दावा केला होता. आपली ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचा दावा पेरुमलने जर्मनीच्या डेर स्पाइजेल या वृत्तपत्राला दिलेल्या इंटव्यूमध्ये केलाय.

विशेष म्हणजे क्रोएशियाविरुद्धच्या मॅचमध्ये कॅमरुनचा खेळाडू एलेक्स सॉन्गने क्रोएशियाच्या खेळाडूला जाणूनबुजून कोपरा मारल्याने त्याला पहिल्या हाफमध्येच रेफ्रीने मैदानाबाहेर काढलं होतं. दरम्यान, याप्रकरणी अद्यापपर्यंत ‘फिफा’नं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कॅमरुन फुटबॉल संघटनेकडून याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Tuesday, July 1, 2014 - 21:49
comments powered by Disqus