'मी बेईमान'... प्रेमाखातर क्रिकेटरनं दिली फिक्सिंगची कबुली!

Updated: Jul 1, 2014, 06:21 PM IST
'मी बेईमान'... प्रेमाखातर क्रिकेटरनं दिली फिक्सिंगची कबुली!

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा क्रिकेटर लू विन्सेंट यानं मॅच फिक्सिंगच्या आरोपाची कबुली दिलीय.

 

मॅच फिक्सिंग करून आपल्या देशाला आणि खेळाला लाज आणणाऱ्या आपल्या या कृत्याबद्दल त्यानं माफी मागितली... आयुष्यभर आपल्या या कृत्याचा खेद राहील, असंही यावेळी त्यानं म्हटलंय. मॅच फिक्सिंगसाठी विन्सेंटवर आजीवन बंदी येणार, हे आता नक्की झालंय.

'माझं नाव लू विन्सेंट आहे आणि मी विश्वासघातकी आहे. मी फिक्सिंगसाठी पैसे घेऊन अनेकदा एक खेळाडू म्हणून आपल्या पदाचा दुरुपयोग केला. मी गेली कित्येक वर्ष हे कडू सत्यासोबत जगत राहिलो पण काही महिन्यांपूर्वी मी समोर येऊन हे सत्य मान्य करायलाच हवं, अशा स्थितीत येऊन पोहचलो' असं भावूक झालेल्या विन्सेंटनं म्हटलं.

याच सत्यानं न्यूझीलंड आणि जगभरात एकच धूमाकूळ माजवला. मी माझ्या देशाला लाज आणलीय... मी माझ्या खेळाला लाज आणलीय... मी अशा लोकांना मान खाली घालायला लावलीय जे माझ्या अत्यंत जवळ आहेत... आणि या कृत्याबद्दल मला अजिबात अभिमान वाटत नाही' असंदेखील विन्सेंटनं कबुल केलंय. 

विन्सेंटवर इंग्लंडमध्ये काऊंटी आणि आता भंगलेल्या इंडियन क्रिकेट लीगमधल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. याचसाठी या आठवड्याच्या शेवटी त्याच्यावर आजीवन बंदी लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बांग्लादेश प्रीमिअर लीगदरम्यान सट्टेबाजांनी संपर्क केल्यानंतर त्याचा रिपोर्ट न करण्याबद्दलही दोषी ठरवण्यात आलंय.  

आपल्या पत्नीनं दिलेल्या प्रेरणेमुळेच खरं बोलण्याचं साहस करू शकलो, असंही या माजी सलामी फलंदाजानं म्हटंलय. याचबरोबर, जे परिणाम समोर येतील त्याचा सामना करण्यासाठीही आपण तयार असल्याचं त्यानं म्हटंलय. 'मी माझ्या अपराधांसोबत जगू शकत नाही... तसंच माझी भावी पत्नी सूसी हिला भेटल्यानंतर कोणत्याही अटींशिवाय प्रेम करणं हे काय असतं हे मला समजलंय. त्याचमुळे, मी तिच्यासोबत हे सत्य कथन करू शकलो... आणि त्याचमुळे, हे सत्य माझ्या आई-वडिलांपुढे, कुटुंबापुढे आणि संबंधित अधिकाऱ्यांपुढे कथन करण्यास तीनं माझी मदत केली' असंही विन्सेंटनं म्हटलंय. 

'मी ज्या व्यक्तींवर प्रेम करतो त्यांचा मला अभिमान आहे... विशेषत: माझं कुटुंब आणि माझे मित्र... त्यांच्यामुळचे मी काही असहज मुद्यांशी झगडू शकलो. माझा अपराध स्वीकार केल्यानंतर मी माझ्या मुलांशी डोळ्यात डोळे घालू शकतो. मी त्यांना सांगू शकतो की प्रामाणिकपणाच सगळ्यात चांगली गोष्ट आहे... काही दिवसांपूर्वी हीच गोष्ट माझ्यासाठी सर्वात कठिण गोष्ट बनली होती. पण, आता एक माणूस म्हणून माझा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे... आता मला स्वत:ची घृणा करत करत प्रत्येक दिवस सुरू करावा लागणार नाही' अशा भावपूर्ण शब्दांत विन्सेंटनं आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचंदेखील म्हटलंय.    
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.