विश्वविजेत्या जर्मनीच्या 'वर्ल्डकप'चं नुकसान

ब्राझीलमध्ये जर्मनीने विश्वचषकावर नाव कोरलं, जर्मनीला जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल २४ वर्षे लागली. ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना जर्मनीच्या खेळाडूंनी चक्क चषकाचे नुकसान केलंय.

Updated: Jul 24, 2014, 11:04 AM IST
विश्वविजेत्या जर्मनीच्या 'वर्ल्डकप'चं नुकसान title=

बर्लिन : ब्राझीलमध्ये जर्मनीने विश्वचषकावर नाव कोरलं, जर्मनीला जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल २४ वर्षे लागली. ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना जर्मनीच्या खेळाडूंनी चक्क चषकाचे नुकसान केलंय.

मायदेशात परतल्यानंतर चाहत्यांना हा चषक उंचावून दाखवत असताना चषकाचे नुकसान झाले. चषकावरील एक सोन्याचा तुकडा पडल्याचा खुलासा जर्मन फुटबॉल असोसिएशनने केला आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष वोल्फगँग निएर्सबॅच यांनी म्हटलंय.

''कोणत्या खेळाडूकडून चषकाचे नुकसान झाले, याबाबत आम्ही चौकशी केली. पण कोणताही पुरावा आम्हाला मिळाला नाही. मात्र हा तुकडा चषकावर व्यवस्थित लावण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञमंडळी आहेत. त्यामुळे चिंतेचं कारण नाही,'' असेही त्यांनी स्पष्ट केलंय.

बर्लिनमध्ये परतल्यानंतर खुल्या बसमधून जल्लोष साजरा करताना खेळाडूंकडे विश्वचषकाची प्रतिकृती देण्यात आली होती. 

जेव्हा बसच्या चाकांखाली आला होता चषक
विजेतेपदाचा आनंद साजरा करताना चषकाचे नुकसान झाल्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २०११मध्ये कोपा डेल रे चषक जिंकल्यानंतर रिअल माद्रिदच्या सर्जिओ रामोसच्या हातातून चषक बसच्या खाली पडला होता. त्यानंतर तो चषक बसच्या चाकांखाली सापडला होता. 

२०१२मध्ये चॅम्पियन्स लीग जेतेपदाच्या आनंदात चषकाचे नुकसान केल्यामुळे चेल्सीच्या तीन खेळाडूंना निलंबित करण्यात आलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.