वेस्टइंडिजने चारली पाकिस्तानला धूळ

भारताकडून सपाटून मार बसलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारत १५० रन्सने दणदणीत विजय मिळविला.

Updated: Feb 21, 2015, 11:42 AM IST
वेस्टइंडिजने चारली पाकिस्तानला धूळ title=
छाया - एपी

क्राइस्टचर्च : भारताकडून सपाटून मार बसलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारत १५० रन्सने दणदणीत विजय मिळविला.

विंडीचे ३११ टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरणा-या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचे खेळाडू भोपळा न फोडता तंबूत माघारी फिरलेत. १ रन्सवर तब्बल ४ खेळाडू बाद झालेत. यामध्ये ३ खेळाडूंना भोपळा फोडता आला नाही. पाकिस्तानचा निम्मा संघ १० ओव्हरमध्येच गारद झाला. त्यामुळे पाकिस्तानची अडचण अधिक वाढली.  

नासीर जमशेद, युनूस खान, हॅरिस सोहेल हे तिघे भोपळा न फोडताच तंबूत परतले. तर अहमद शेहजाद १ रन्सवर आऊट झाला. पाकिस्तानच्या २४ रन्स झाल्या असताना कर्णधार मिसबाह उल हकही बाद झाला आणि पाकची अवस्था ५ बाद २५ अशी झाली.  

उमर अकमल (५९ रन्स) आणि सोहेब मकसूद (५० रन्स) या जोडीने महत्त्वपूर्ण भागीदारी करत पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवापासून रोखले. ही जोडी फोडण्यात वेस्ट इंडिजला यश आले. शाहिद आफ्रिदीने २८ रन्सची खेळी करत पाकला १५०चा टप्पा गाठून दिला. अखेरीस १६० रन्सवर पाकचा डाव संपुष्टात आला.

वेस्ट इंडिजने पाकवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. विंडीजतर्फे जेरॉम टेलर व अँड्रे रसेलने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर सुलेमान बेनने दोन विकेट घेतल्या. जेसन हॉल्डर व डॅरेन सॅमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. १३ बॉलमध्ये ४२ रन्स ठोकणा-या आणि पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवणा-या वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू अँड्रे रसेलने सामनावीराचा किताब पटकावला. 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेल आणि ड्वॅन स्मिथ या सलामीवीरांना पाकच्या गोलंदाजांनी अवघ्या २८ रन्समध्येच माघारी पाठवले. यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि मार्लोन सॅम्यूअल्स या जोडीने ७५ रन्सची भागीदारी करत विंडीजला शंभरी गाठून दिली. दिनेश रामदीन ५१ धावांवर बाद झाला त्यावेळी विंडीजची अवस्था ३९. ५ षटकांत ४ बाद १९४ अशी  होती. यानंतर लेंडल सिमन्स (५०), डॅरेन सॅमी (३० ) आणि अँड्र रसेलच्या तडाखेबाज नाबाद ४२ रन्सच्या खेळीने विंडीजने ५० ओव्हरमध्ये ६ गडी गमावत ३१० रन्स केल्या. 

पाकिस्तानने या सामन्यातही ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. पाकिस्तानने तब्बल ४ कॅच सोडले. यातील दोन झेल शाहिद आफ्रिदीने सोडले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.