'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...

एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. 

Updated: Jul 15, 2016, 12:07 PM IST
'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...  title=

मुंबई : एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. 

नुकतंच, २९ वर्षीय सानियाच्या 'एस अगेन्स्ट ऑड' या आत्मचरित्राचं अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. याच निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक मुलाखत घेतली. 

याच दरम्यान, 'या सेलिब्रिटी स्टेटसमध्ये सानिया सेटल कधी होणार? आणि दुबईत होणार की आणखी कुठे? आणि कुटुंबाबद्दल आणि मातृत्वाबद्दल काय? याबद्दल पुस्तकात काहीही उल्लेख वाचायला मिळाला नाही.. असं दिसतंय की तू सेटल होण्यासाठी रिटायर होऊ इच्छित नाहीस' असा प्रश्न राजदीप सरदेसाई यांनी सानियाला विचारला.

यावर, सानियानं दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. यावेळी, 'तुम्हाला असं खरंच वाटतंय की मी सेटल नाही?' असा प्रतिप्रश्न सानियानं केला. 'मी मातृत्वाऐवजी जगातील नंबर वन खेळाडू होणं निवडलं याबद्दल तुम्ही निराश दिसत आहात... हा प्रश्न अशा प्रश्नांपैंकी आहे की ज्यांचा आम्हा प्रत्येक महिलेला सामना करावा लागतो... पहिल्यांदा लग्न आणि दुसरं म्हणजे मूल... तेव्हाच इतरांच्या नजरेत आम्ही 'सेटल्ड' बनतो. दुर्देवानं आम्ही किती विम्बल्डन जिंकले किंवा आम्ही नंबर वन बनलो... हे फारसं महत्त्वाचं नसतं' असं सानियानं म्हटलं.

यावर, राजदीप सरदेसाई यांनी आपली चूक  लगेचच मान्य करत आपण चुकीच्या शब्दांत विचारलेल्या प्रश्नाबद्दल माफी मागितली... तसंच 'तू कधी सेटल होणार? हा प्रश्न मी कधीही एखाद्या पुरुष खेळाडूला विचारला नाही' असंही त्यांनी यावेळी मान्य केलं. 

यानंतर, 'मला आशा आहे की एखाद्या २९ वर्षांच्या महिलेला तू आई कधी बनणार हा प्रश्न विचारला जाणार नाही... आणि तेव्हा जेव्हा ती जगात नंबर वनवर असेल' अस सानियानं म्हटलंय.