आयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय?

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये एक धक्कादायक बाब होती ती म्हणजे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांची अनुपस्थिती.

Updated: Apr 10, 2016, 04:50 PM IST
आयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय?  title=

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये एक धक्कादायक बाब होती ती म्हणजे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांची अनुपस्थिती. क्रिकेट कॉमेंट्री म्हटली की हर्षा भोगले यांचं नाव आपोआपच येतं. पण, यंदाच्या आयपीएलच्या मोसमात ते नसतील.

संडे एक्सप्रेसमध्ये आलेल्या बातमीनुसार आयपीएलने त्यांच्यासोबत केलेला करार रद्द केल्याची सूचना त्यांना केवळ एक आठवडा आधी देण्यात आली. खरं तर आयपीएलच्या अगदी पहिल्या मोसमापासून भोगले संलग्न राहिले आहेत. या मोसमाच्या खेळाडूंच्या लिलावादरम्यान त्यांनी सूत्रसंचालनही केले होते. त्यांची विमानाची तिकीटं आणि हॉटेल बुकिंग्सही करण्यात आली होती. तसेच आयपीएलच्या प्रमोशन व्हिडिओतही ते दिसले होते. मग असा तडकाफडकी निर्णय का घेतला गेला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

सोनी नेटवर्ककडे आयपीएलचे सामने दाखवण्याचे अधिकार असले तरी आयपीएलच्या निर्मितीसंदर्भातले सर्व निर्णय बीसीसीआयतर्फे घेतले जातात. 'एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा झाल्यास आम्ही सोशल मीडियावर कॉमेंटेटरविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेतो, तसेच खेळाडूंकडूनही आम्ही माहिती घेतो,' असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने संडे एक्सप्रेसला सांगितलं. 

टी-२० विश्वचषकात भारत - बांगलादेश सामन्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही भारतीय कॉमेंटेटर टीका केली होती. कर्णधार धोनीनेही त्या आक्षेपाला दुजोरा दिला होता. पुढे बच्चन यांनी ते सुनिल गावसकर अथवा संजय मांजरेकर यांच्याविषयी बोलत नसल्याचं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना भोगले यांनी हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्री या कशा वेगळ्या असतात ते सांगितलं होतं. या वादाची बरीच चर्चाही झाली होती. 

दरम्यान काहींच्या मते याला नागपूर येथे विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि भोगले यांच्यातील एक वाद कारणीभूत असण्याची शक्यता आहे. भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कॉमेंट्री बॉक्सच्या आयोजनावरुन हा वाद झाला होता. त्यात बरीच वादावादी झाली होती. हा वाद बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यापर्यंत पोहोचला होता. 

'मला कोणीच काहीही सांगितलं नाही. खरं कारण काय आहे ते मला अजूनही औपचारिकपणे सांगितलेलं नाही. मला इतकंच समजलंय की हा बीसीसीआयने घेतलेला निर्णय आहे,' असं भोगले या संपूर्ण प्रकरणावर म्हणालेत. त्यांनी आयपीएलचा हा मोसम दणक्यात व्हावा अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.