‘सुपर-८’साठी टीम इंडिया सज्ज!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, September 26, 2012 - 12:44

www.24taas.com, कोलंबो
श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅचेस जिंकत धडाक्यात सुरूवात केली आहे. सुपर-८ गटात प्रवेश करणा-या टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचा समावेश झाल्याने या ग्रुपला `ग्रुप ऑफ डेथ` म्हणूनही ओळखलं जातंय... त्यामुळेच टीम इंडिया हे आव्हान परतवून लावण्यासाठी सर्व शक्तिनिशी मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध घाम गाळून मिळवलेल्या विजयानंतर डिफेंडिंग चॅम्पियन इंग्लंडचा ग्रुप स्टेजमध्ये पाडाव करत टीम इंडिया सुपरएटमधील आव्हानांकरता सज्ज झाली आहे. सुपरएट करता सेकंड ग्रुपमध्ये भारतासह तीनवेळचे वन-डे क्रिकेटचे बादशाह ऑस्ट्रेलियासह, पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. त्यामुळे सुपरएटमध्ये भारताचा मार्ग खडतर झालाय.
२८ सप्टेंबर रोजी भारताचा पहिला मुकाबला होणार आहे तो ऑस्ट्रेलियाशी... वन-डे क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणा-या कांगारूंना टी-२० मध्ये जेतेपदाने सतत हुलकावणी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंट्समध्ये दोन वेळा आमने सामने आले आहेत. यात भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकेका विजयाची नोंद केलीय. आयसीसीची कोणतीही टूर्नामेंट असो त्यात भारत विरूद्ध पाकिस्तान या मॅचचा तडका कायमच असतो. या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये बाजी कोण मारणार याकडेच जगातील सा-याच क्रिकेट फॅन्सचं लक्षं लागलेलं असतं. लंकेत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान ३० सप्टेंबर रोजी आमने-सामने उभे ठाकणार आहेत. माजी टी-२० चॅम्पियन असणारे भारत-पाकिस्तान या टीम्स टी-२० वर्ल्डकप इतिहासात आतापर्यंत दोनदा सामोरासामोर उभ्या राहिल्या आहेत. २००७ टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने श्वास रोखून धरायला लावणा-या दोन्ही मॅचेसमध्ये बाजी मारली.
२००७ मधील पाकिस्तानविरूद्ध भारताच्या शेवटच्या विजयाची नोंद टी-२० वर्ल्डकप इतिहासात सुवर्णाक्षरांनी झालीय. त्याला कारणंही तसंच होतं. जोहान्सबर्गवर भारताने पाकिस्तानचा ५ रन्सनी पराभव करताना पहिल्या वहिल्या टी-२० जेतेपदाला गवसणी घातली होती. सुपरएटमध्ये भारताची अखेरची लढत होणार आहे ती दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २ ऑक्टोबर रोजी... भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्स आतापर्यंत झालेल्या तिनही टी-२० वर्ल्ड कपमध्ये एकमेकांना भिडल्या आहेत. तब्बल तीनवेळा प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने आलेल्या या दोन्ही टीम्समध्ये टीम इंडिया वरचढ ठरली. टी-२० वर्ल्डकप सुपर-८ ग्रुपमधील, भारतासह इतर टीम्सचा परफॉर्मन्स पाहता धोनी ब्रिगेडचा प्रवास सोपा असणार नाही. दोन जी टी-२० चॅम्पियन्ससह, पहिल्या टी-२० वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न पाहणारी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका जीवाचं रान करून, स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यास आतापासूनच तयारीला लागले असणार यांत शंका नाही.

First Published: Wednesday, September 26, 2012 - 12:43
comments powered by Disqus