टीम इंडियाच्या मार्गात अनेक काटे!

कट्टर प्रतिस्पर्धी पाकला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आणि प्रशंसक खूपच खूष असले तरी टी-२० विश्व चषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताच्या मार्गात अनेक काटे आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 1, 2012, 06:06 PM IST

www.24taas.com, कोलंबो
कट्टर प्रतिस्पर्धी पाकला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आणि प्रशंसक खूपच खूष असले तरी टी-२० विश्व चषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताच्या मार्गात अनेक काटे आहेत. त्यामुळी भारताला सुपर ८च्या आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागणार आहे. तसेच हा विजय प्रभावशाली असला पाहिजे, त्यामुळे त्यांचा रन रेट पाकिस्तानपेक्षा अधिक होऊ शकतो.
या खेरीज भारताला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यावरही नजर ठेवावी लागणार आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने हरवले तर त्यांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होण्याची शक्यता वाढू शकते.
पहिल्या सुपर ८ सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारल्यामुळे भारताच्या मार्गात हे काटे पसरले आहेत. पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयामुळे भारताचा मार्ग जरा सुकर झाला आहे. परंतु संघर्ष अजून संपलेला नाही. दक्षिण आफ्रिका सध्या खराब फॉर्मात असली तरी पुढील सामन्यात भारताला विजय मिळेल ही शक्यता आपण गृहीत धरणे चुकीचे ठरणार आहे. एबी डिव्हिलर्सच्या नेतृत्वाखाली खेळणारी दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला असला तरी तो भारताचे काम खराब करू शकतो.
भारतासाठी सकारात्मक गोष्ट म्हणजे योग्यवेळी भारतीय खेळाडू क्लिक झाले आहेत. एका मोठ्या विजयानंतर त्यांनी स्वतःला सेमी फायनलच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. आता पाकिस्तानला हरविण्यापेक्षा नेट रनरेट वाढविण्यावर भारतीय खेळाडूंना भर द्यावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया चांगल्या रन रेटमुळे यापूर्वीच चार अंक मिळवून सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. तर पाकिस्तान दोन अंक आणि चांगला रन रेटमुळे दुसऱ्या स्थानावर आहे. भारत तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे.