बँकेचे व्यवहार करणं होणार अधिक सोपं. अकाऊंट नंबरशिवाय करता येणार पैसे ट्रान्सफर

बँकेचे व्यवहार करणं  अजूनही तसं किचकट काम आहे. पण यावर आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियानं तोडगा काढला आहे. 

Updated: Jan 24, 2016, 05:52 PM IST
बँकेचे व्यवहार करणं होणार अधिक सोपं. अकाऊंट नंबरशिवाय करता येणार पैसे ट्रान्सफर title=

नवी दिल्ली : टेक्नोलॉजीच्या या जगामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण बँकेचे व्यवहार करणं मात्र अजूनही तसं किचकट काम आहे. पण यावर आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियानं तोडगा काढला आहे. 

नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन लवकरच युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयची सेवा सुरु करणार आहे. जगातली अशी ही पहिलीच सेवा असणार आहे. या सेवेमुळे आता फक्त एका एसएमएसद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. यासाठी ओटीपी म्हणजेच वनटाईम पासवर्डची गरज पडणार नाही.
अकाउंट नंबरचीही गरज नाही
युपीआयमुळे आता कोणताही व्यवहार करायचा असेल तर अकाऊंट नंबरची गरज पडणार नाही. आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील, त्याचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर किंवा बँकेत दिलेला इ-मेल आयडी असेल तर थेट हे पैसे देता येतील. युपीआयची ही सेवा 24 तास सुरु राहणार आहे. 

वेगळ्या बँक अकाऊंट्सचीही गरज नाही
युपीआयच्या या सेवेमुळे तुम्हाला प्रत्येक बँकेचे ऍप ठेवायचीही गरज पडणार नाही. नॅशनल पेमेंट कॉरपोरेशननं तयार केलेलं ऍप वापरलं तर फक्त याच ऍपवरुन तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचे व्यवहार करण्यात येतील.

एप्रिलपासून सुरु होणार युपीआय
नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन युपीआयची सेवा एप्रिलपासून सुरु करण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांशी चर्चाही सुरु आहे. आत्तापर्यंत 25 पेक्षा जास्त बँक ही सेवा देण्यासाठी तयार झाल्याचंही नॅशनल पेमेंट कॉरपोरेशननं सांगितलं आहे.