'फेसबुक'वर प्रेमात पडली, गोवऱ्या थापणं 'लाईक' करतेय

अमेरिकेतील हायफाय लाईफ स्टाईल सोडून एक महिला भारतात आली आहे. एड्रियाना पेरल ही ४१ वर्षीय महिला फेसबुकवरून भारतीय तरूणाच्या प्रेमात पडली आहे.

Updated: Jan 29, 2014, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अमेरिकेतील हायफाय लाईफ स्टाईल सोडून एक महिला भारतात आली आहे. एड्रियाना पेरल ही ४१ वर्षीय महिला फेसबुकवरून भारतीय तरूणाच्या प्रेमात पडली आहे.
एड्रियानाने मुकेश कुमार नावाच्या २५ वर्षीय तरूणाशी विवाह केला आहे. एवढंच नाही, हरियाणातील पानीपतमधील हिसार गावात तिने भारतीय संस्कृती पाळून, मुकेशसोबत संसाराला सुरूवात केली आहे.
अगदी भाकरी बनवतांना तिने हाताला चटकेही घ्यायला सुरूवात केली आहे, एवढी ती मुकेशच्या संसारात रमली आहे.
एड्रियानाचं लाईफस्टाईल या पूर्वी आणखी वेगळी होती. पबला जाणं आणि पिझ्झा खाणं, प्रत्येक सिनेमा न चुकता पाहणं असं तिचं लाईफ होतं. मात्र आता हिसार गावात येऊन ती जेवण तर बनवतेच, पण गोवऱ्या सुद्धा थापते.
एड्रीयानाने आपल्यापेक्षा १६ वर्षाच्या लहान व्यक्तीशी लग्न केलं आहे, यावर एड्रियाना म्हणते, माझ्या आयुष्यात अनेक अफेअर्स झाली मात्र, खरं प्रेम करणारं मला कुणीही मिळालं नाही, मी जे काही करतेय, ते फक्त माझ्या खऱ्या प्रेमासाठी, खऱ्या प्रेमाची किंमत ते जेव्हा मिळत नाही, तेव्हाचं कळतं, असंही एड्रियाना म्हणते, एड्रियाना आपल्या पंचवीस वर्षाच्या मुलीला अमेरिकेत सोडून भारतात आली आहे.
फेसबुकवर मुकेश कुमार आणि एड्रियानाजवळ आले, सुरूवातीला मुकेशने प्रेम व्यक्त केलं. यानंतर एड्रियाना आणि मुकेश सतत फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होते. एकेदिवशी मुकेशने फोन केला आणि एड्रियानानेही मुकेशला होकार दिला.
एड्रियानाने सुरूवातीला मुकेशला दिल्लीच्या एअरपोर्टवर पाहिलं तेव्हा खूप आनंद झाल्याचं सांगितलं, एड्रियाना गावात आली तेव्हा मुकेशच्या घरी टॉयलेचीही सोय नव्हती.
एड्रियानाला मुकेशच्या घरातील लोक सेलिब्रिटीप्रमाणे वागवत होते. मात्र शॉवर आणि फॅन्सी टॉयलेटशिवायही एड्रियाना मुकेशच्या घरात संसारात रंगली आहे.
एड्रियानाची मुलगी सुरूवातीला आपल्या आईबद्दल फार चिंता करत होती. भारतात महिला सुरक्षित नाहीत, मुकेशने फेक प्रोफाईल बनवलं असेल, असंही तिला सांगण्यात आलं होतं. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती.
एड्रियाना म्हणते, इथं महिलांवर फार बंधन आहेत. नेहमी चेहरा आणि हातपाय झाकून ठेवावे लागतात.
एड्रियाना आता थोडीफार हिंदीही बोलते, तर मुकेशनेही इंग्रजीत सुधारणा करायला सुरूवात केली आहे. एड्रियाना आता अधून मधून अमेरिकेत जाण्याच्या विचारात आहे.
भारत हे आपलं दुसरं घर असल्याचं ती म्हणते. आपल्याला दोन मुलं व्हावीत, अशी आपल्या सासूची इच्छा असल्याचंही एड्रियाना सांगते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.