गमतीशीर मोबाईल अॅप्लिकेशन... पण धोकायदायकही!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, November 28, 2013 - 20:10

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या मोबाईलवर बॉसचा फोन आला... तुम्ही घाईघाईनं तो उचललात आणि पलिकडून आवाज आला तुमच्या मित्राचा... आता तुमचा मित्र बॉससोबत आहे की बॉसचा फोन मित्रानं पळवलाय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण, खरं यातल्या दोन्ही शक्यता चुकीच्या ठरतील. कारण, हा करिष्मा असेल एका अॅन्ड्रॉईड अॅप्लिकेशनचा... हे अॅप्लिकेशन वरवर जरी गमतीदार वाटत असलं, तरी याचा वापर गुन्हेगारही करू शकतात, अशी भीती व्यक्त होतेय.
हा जमाना स्मार्ट फोनचा आहे... जवळजवळ प्रत्येकाच्या हातात तुम्हाला स्मार्ट फोन, टॅब दिसतात. गुगलच्या ‘अॅन्ड्रॉईड’ या ऑपरेटिंग सिस्टिममुळे तर मोबईलवर असंख्य अॅप्स फुकट डाऊनलोड होतात. असंच हे आणखी एक अॅप्लिकेशन आहे. या अप्लिकेशनमुळे तुम्ही ‘कॉलर आयडी’ म्हणून कोणताही नंबर सेट करू शकता. त्यानंतर तुम्ही कुणालाही फोन केलात, की तुमच्या क्रमांकाऐवजी सेट केलेला नंबरच समोरच्या मोबाईलवर दिसतो.
हे अॅप्लिकेशन अतिशय धोकादायक आहे. कारण, धमक्या देण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी किंवा अगदी कुणाची छेड काढण्यासाठीही याचा गैरवापर केला जाऊ शकतो. आर्थिक गुन्हेगारीमध्येही हे अॅप्लिकेशन वापरलं जाऊ शकतं. मात्र, दुर्देवाने आपल्या देशाच्या सायबर कायद्यानुसार अॅप्लिकेशन ब्लॉक करता येत नाहीत. त्यामुळेच सध्या तरी यावर बंदी घालणं अशक्य असल्याचं पोलीस मान्य करतात.
खरं तर हे धोकादायक अॅप्लिकेशन निर्मात्यांशी संपर्क साधून बंद करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. मध्यंतरी सर्व्हरवरील माहिती पुरवण्यावरून ब्लँकबेरीलाही आपण देशाचा कायदा स्वीकारण्यास भागं पाडलं होतं. त्याच पद्धतीनं या अॅप्लिकेशनवर बंदी आणण्याची गरज आहे. गुन्हेगारांच्या हातात पडलेलं हे ‘स्मार्ट’ कोलीत लवकरात लवकर काढून घेणं आवश्यक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 28, 2013 - 20:05
comments powered by Disqus