गुगलचं भारतीयांना आव्हान...

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, August 14, 2013 - 12:09

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरुवात होणाऱ्या ‘गुगल इम्पॅक्ट चॅलेंज इन इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत गुगलनं हे आव्हान भारतीयांसमोर ठेवलंय. या उपक्रमांतर्गत ‘ना नफा’ तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या संस्थांनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करता येईल याबद्दलच्या कल्पना मांडायच्या आहेत. आपली कल्पना गुगलमार्फत उत्तमप्रकारे उतरवणाऱ्या पहिल्या चार संस्थांना त्यांच्या ‘कल्पना’ प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकी सुमारे तीन कोटी रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. शिवाय यासाठी लागणारी तांत्रिक मदतदेखील गुगल पुरविणार आहे.
`गुगल` चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यवसाय अधिकारी निकेश अरोरा यांनी ‘गुगल` च्या ब्लॉगवर या प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट केलीय. ‘भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा उत्सव साजरा करीत आहोत. त्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या आणि जग सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था शोधून काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे` असं अरोरा यांनी म्हटलंय.

काय आहे ‘गुगल इम्पॅक्ट चॅलेंज इन इंडिया’?
> लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल, हे ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सांगायचे आहे.
> सर्वांत शेवटी उत्तम कल्पना मांडणाऱ्या चार संस्थांना प्रत्येकी सुमारे तीन कोटी रुपयांचा ग्लोबल इम्पॅक्ट अॅवॉर्ड.
> त्यांच्या कल्पनेतील प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलकडून तांत्रिक साह्य.
> ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत : पाच सप्टेंबर २०१३
> जगभरातील गुगल वापरकर्ते सर्व कल्पनांबाबत आपले मत नोंदवतील.
> दहा उत्तम प्रकल्पांची घोषणा : २१ ऑक्टोबर २०१३
> राम श्रीराम , जॅकलिन फुलर , अनू आगा , जयंत सिन्हा आणि निकेश अरोरा हे परीक्षक त्या सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून अंतिम तीन जणांची निवड करतील.
> लोकांच्या मतानुसार ` फॅन फेव्हरिट ` प्रकल्पही निवडला जाईल.
> ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



First Published: Wednesday, August 14, 2013 - 12:09


comments powered by Disqus