`मनसेच्या मोबाईल अॅप`चं इंजिन घसरलं!

मनसेच्या वर्धापनदिनी खुद्द राज ठाकरेंच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या थाटात `एम एन एस अधिकृत` हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं... पण, लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी मनसेच्या मोबाईल अॅपचं इंजिन रुळावरून घसरलेलं दिसतंय.

Updated: Mar 10, 2014, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या वर्धापनदिनी खुद्द राज ठाकरेंच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या थाटात `एम एन एस अधिकृत` हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं... पण, लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी मनसेच्या मोबाईल अॅपचं इंजिन रुळावरून घसरलेलं दिसतंय.
लोकसभेच्या तोंडावर सर्वच पक्षांनी `डिजिटल माध्यामां`चा वापर करत युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. यासाठी सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातोय. ट्विटर आणि फेसबुकवर तर पक्षांची आणि नेत्यांची चढाओढच लागलेली दिसतेय... त्यांच्याच पायावर पाय देत, निवडणुकीच्या रणांगणात मागे पडू नये म्हणून मनसेनंही आठव्या वर्धापनदिनी `एमएनएस अधिकृत` हे मोबाईल अॅप `पक्षाचं मुखपत्र` म्हणून लॉन्च केलंय.
याबरोबर पक्षाचं फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्यूब चॅनलही सुरू करण्यात आलंय. मात्र, या पेजवर नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनाचे फोटो, भाषणही दिसत नाहीय. इतकंच काय तर काल खुद्द राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांची नावंही इथं अपडेट झालेली दिसत नाहीत.
मुख्य म्हणजे, मराठीचा पुळका असल्याचं सांगत मतांचा जोगवा मागणाऱ्या या पक्षानं आपली एकही पोस्ट मराठीत टाकलेली नाहीय.
भाजप, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी, काँग्रेस यासारखे पक्ष `सोशल मीडिया`वर सदैव अपडेट दिसतात. युवासेनेचे आदित्य ठाकरे नेहमीच ट्विटरवर अपडेट असतात. मात्र, मनसेच्या टीमला मात्र ते काही जमलेलं दिसत नाहीय.
मनसेचं मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करतानाही यूजर्सला बऱ्याच समस्या येत आहेत. अत्यंत वेळखाऊ असलेलं हे अॅप्लिकेशन सारखं सारखं हँग होताना दिसतंय.
याबाबत, मनसेकडे विचारणा केली असता एकाच वेळी जास्त युजर्स डाऊनलोड करत असल्यामुळे सर्व्हरवर ताण आल्याचं मनसेचे तांत्रिक सल्लागार सौरभ करंदीकर सांगत आहेत. या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.