सिम-स्वॅप फ्रॉडमुळे तुमच्या बँकेतील पैसे असुरक्षित

आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी एक निवेदन जाहीर केले आहे.

Updated: Aug 3, 2016, 06:56 PM IST
सिम-स्वॅप फ्रॉडमुळे तुमच्या बँकेतील पैसे असुरक्षित title=

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी एक निवेदन जाहीर केले आहे. एका सिम-स्वॅप फ्रॉडविषयी हे निवेदन आहे. यात ग्राहकांना डुप्लिकेट सिमकार्ड दिले जाते. त्याची नोंद ग्राहकांच्या नावे केली जाते. त्याच नंबरच्या दुसऱ्या सिमवरून त्या व्यक्तीच्या सर्व बँक व्यवहारांची माहिती चोरली जाते. ग्राहकाकडे असलेल्या नंबरवर बँकेच्या नावे खोटे मेसेजेस पाठवले जातात. बँकेच्या खोट्या वेबसाईटवर लॉग इन करण्यास सांगितले जाते.

लॉग इन करताना तुमची सर्व वैयक्तिक आणि बँकसंबंधी माहिती मागितली जाते. खात्री करून घेण्यासाठी तुमच्या नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. या माध्यमातून तुमच्या खात्यातील पैसे चोरले जातात. अशा या सिम-स्वॅप फ्रॉडपासून ग्राहकांनी सावध राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

सिम-स्वॅप फ्रॉड टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता ?

1.     तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसेल आणि बराच काळ तुम्हाला कोणतेही मेसेजेस किंवा फोन कॉल्स आले नसतील तर तुमच्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा.

2.     सिम-स्वॅप फ्रॉडविषयी कोणतेही संकेत मिळाले असता तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कळवा.

3.     तुमचा फोन सतत वाजत असेल तर तो स्विच ऑफ करू नका. तुम्हाला फोन स्विच ऑफ करण्यास भाग पाडणे हा उद्देश त्यामागे असू शकतो.

4.     तुमच्या सर्व बँक व्यवहारांची माहिती एसएमएसव्दारे मिळवण्यासाठी बँकेकडे तुमच्या नंबरची नोंद करा.

5.     तुमचे बँक स्टेटमेंट्स आणि ऑनलाईन बँकींग हिस्ट्री नियमितपणे तपासा. त्यात काही संशयास्पद नाही ना याची खात्री करून घ्या.