असुर्डे रेल्वे स्थानकाबाबत बैठक

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, September 11, 2012 - 17:31

www.24taas.com,रत्नागिरी
कोकण रेल्वेमार्गावर संगमेश्वर तालुक्यात असुर्डे येथे रेल्वे स्थानक उभारण्याच्या मागणीबाबत दोन दिवसांत बैठक बोलविण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असुर्डे येथील ‘रेल रोको’ करण्यात आले होते.
कोकण रेल्वे महामंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबर ही बैठक होणार आहे. असुर्डे रेल्वे स्थानकाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी दिले. सावर्डे आणि आरवली रोड या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असुर्डे येथे रेल्वे स्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. असुर्डे येथे रेल्वे स्थानक झाल्यास या परिसरातील सुमारे ४० गावांच्या ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
खासदार राणे यांनीही खासदार निधीतून ७८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पण कोकण रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्षच केले. सोमवारी मुंबईहून मडगावला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखण्याचा आंदोलकांचा इरादा होता. पण कोकण रेल्वे प्रशासनाने ती सावर्डे स्थानकावर थांबवून रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस आधी सोडली.
या आंदोलनामुळे कोकण रेल्वेचे दुपारच्या सत्रातील गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.आमदार राजन तेली, माजी आमदार गणपत कदम, सुभाष बने यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. याआधी मनसेने या स्थानकासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते.

First Published: Tuesday, September 11, 2012 - 17:31
comments powered by Disqus