खाजगी आश्रमशाळेत बालकांवर लैंगिक अत्याचार उघड

रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या एका खाजगी आश्रमात अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा संतापजनक प्रकार उघड झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 09:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या एका खाजगी आश्रमात अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा संतापजनक प्रकार उघड झालाय.
संस्थेच्या आश्रमात शिकणाऱ्या लहान मुला-मुलींवर लैंगिक शोषण होत असल्याचं उघड झालंय. 2002 सालापासून पुण्यातील `रत्नप्रभा चॅरिटेबल संस्था` चार ते चौदा वयोगटातल्या मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचं काम करतेय. असं असताना संस्थाचालक अजित दाभोलकर आणि मुलांच्या सांभाळ करणाऱ्या ललिता तोंडे यांनी इथल्या निराश्रित, गरीब मुला-मुलींना आश्रय देऊन, शिक्षणाचे स्वप्न दाखवून अनन्वित शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
या मुलांनी आपल्या पालकांना याबाबत घरी सांगितल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघड झाला. टाकवे येथील चंद्रप्रभा चरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेत मुला-मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार येथील पीडित मुलांच्या आई-वडिलांनी पुणे आणि रायगडच्या चाइल्ड हेल्पलाइनला केली होती. या मुलांच्या वतीने रायगड चाइल्ड हेल्पलाइनने कर्जतच्या पोलिसात तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली.
मुलांच्या जबानीवरुन संस्थाचालक अजित दाभोलकरला अटक करण्यात आलीय. त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, जबरदस्तीने ताब्यात ठेवणे, इंटरनेटवरून बदनामी करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, संस्थाचालक आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलेनं आपल्यावरचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.