‘चवदार’ तळ्याची चव अन् स्मारकाची रया गेली!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील सरकारचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून स्मारक उभारायचं आणि त्याकडे नंतर पाठ फिरवायची...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 29, 2013, 03:20 PM IST

www.24taas.com, रायगड
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील सरकारचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून स्मारक उभारायचं आणि त्याकडे नंतर पाठ फिरवायची. असाच धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये समोर आलंय.
महाडच्या चवदार तळ्याजवळ उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या स्मारकाचे वीज बिल न भरल्यामुळं इथला वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. तर इथं उभारलेल्या ग्रंथालयात पुस्तकांपेक्षा रद्दीचाच जास्त भरणा आहे. वस्तू संग्रहालय आहे पण त्यात वस्तूंचा पत्ताच नाही. या स्मारकाच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च केल्याचं दाखवलं जातं. मात्र, हे पैसे नेमके जातात कुठं? कोण हा निधी लाटतं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळं या स्मारकाची अवस्था अत्यंत वाईट आहे.

पुण्यातील डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे या स्मारकाचा ताबा आहे. मात्र, या संस्थेचं स्मारकाकडे किती लक्ष आहे हे, या स्मारकाकडे पाहिल्यानंतर जाणवतं. सरकारनं तब्बल १७ कोटी रुपये खर्च करून दहा हजार चौरस फुटांवर हे स्मारक उभारण्यात आलंय. मात्र, बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून केवळ नावापुरतं स्मारक उभारल्याचं यानिमित्तानं समोर आलंय.