राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण साधणार काय?

ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा शिगेला राजकीय पक्षांची स्टंटबाजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं उपोषण, नगरसेवकही बसले उपोषणाला काही ठिकाणी फोडल्या बसगाड्या..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 6, 2013, 02:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांसह आमदार नगरसेवकांनी उपोषण सुरू केलंय. या उपोषणामुळे काय साध्य होणार असा सवाल ठाणेकर विचारत आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंटमधून धोकादायक इमारतीतल्या रहीवाशांना काही लाभ होणार की फक्त राजकीय पोळी भाजली जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा शिगेला
राजकीय पक्षांची स्टंटबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं उपोषण, नगरसेवकही बसले उपोषणाला
काही ठिकाणी फोडल्या बसगाड्या..
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा रेटण्यासाठी ठाणे कल्याणचे खासदार, आमदार जितेंद्र आव्हाड नगरसेवक असा सगळा फौजफाटा उपोषणाला बसलाय. मुख्यमंत्र्यांना यातून शह देण्याची राजकीय खेळीही यातून खेळली जात आहे. विशेष म्हणजे जी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर विराजमान आहे तिच्यावरच अशी उपोषण करण्याची वेळ आलीय. आनंद परांजपे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले कल्याण मतदारसंघाचे खासदार ठाण्यात उपोषणाला बसलेत हे पण विशेष. या आंदोलनाला हिंसक वळणंही लागायला लागलंय. ठाणे आणि कळव्यात काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार घडले. बस जाळण्याचाही प्रयत्न झाला.. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकराला पडत आहे. यातून काही सवाल उपस्थित होतात
ठाण्यात याच आमदारांच्या कार्यकाळात मुंब्रा आणि शिळफाट्यातल्या दुर्घटनांआधी वागळे इस्टेटमध्ये २ आणि कळव्यात १ बिल्डींग पडली होती.. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उपोषणाला का बसली नाही?
स्वतःच्या सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण का करावं लागत हो.. स्वतःचं सरकार कार्यक्षम नाही हे त्यांना दाखवून द्यायचंच का?
हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुड गव्हर्नंन्सचं लक्षण आहे का?
सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षावर असं उपोषणं, भजनं करण्याची वेळ का आली?
क्लस्टर डेव्हलपमेंट हे खरचं नागरिकांच्या हिताचं की बिल्डर लॉबीच्या?
इतके वर्ष ठाण्यासह मुंब्र्यात ज्या वेगाने अनधिकृत बांधकामं झाली त्याला अभय कोणाचं होतं?
ही बांधकामं होत असताना हे आमदार नगरसेवक खासदार कुठे होते? त्याचवेळी हे का रोखलं नाही?
कल्याणचे खासदार आनंद परांजपे हे उपोषण करत आहेत. हे उपोषण त्यांच्यासाठी नवरात्रीचा सक्तीचा उपवास तर झालेला नाही. खासदारांसह नगरसेवक उपोषणावर असताना आमदार मात्र साखळी उपोषणावर आहेत. मग आमदारांच्या साखळी उपोषणाचं कारण काय..
त्यातच ठाण्यात मुख्यमंत्री येणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपली ठाणे भेट रद्द करून टाकली. या उपोषणातून मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरच उलटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलंय. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आरंभलेल्या या राजकीय नौटंकीचा मुख्यमंत्र्यांवर काहीच परिणाम झालेला नाही.. त्यामुळे इतरांना आमरण उपोषणावर बसवणारे आणि स्वतः मात्र साखळी उपोषणावर बसणारे जितेंद्र आव्हाड आता स्वतःच आमरण उपोषण करणार का हे पाहावं लागेल..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.