अनधिकृत बांधकामाचा पैसा `मातोश्री`वर - राणे

आमदार भास्कर जाधव यांनी शेलक्या शब्दात केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनाला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टार्गेट केलं आहे.

Updated: May 31, 2013, 08:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर आमदार भास्कर जाधव यांनी शेलक्या शब्दात केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनाला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टार्गेट केलं आहे. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक प्रहार केला आहे... ‘मातोश्रीवर पैसा कसा जातो, अनधिकृत बांधकामांना शिवसेना खतपाणी घालते.’ असा गंभीर आरोपच नारायण राणेंनी केला आहे.
‘ठाण्यात शिवसेना आमदारांनी अनधिकृत बांधकामं केली आणि त्यातून येणारा पैसा मातोश्रीवर पोहचवण्याचे काम केलं.’ असा हल्लाबोल राणेंनी ठाण्यातल्या वचनपूर्ती मेळाव्यात केला आहे. नारायण राणेंनी चौफर टीका करीत उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. मराठी मुद्दा घेऊन शिवसेनेने राजकारण केलं. मात्र मुंबईतून मराठी माणूस कमी होण्यालाही शिवसेनाच जबाबदार असल्याची टीकाही राणेंनी केली.
गेले काही दिवस नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली नव्हती. मात्र आता त्यांनी मातोश्रीवर पैसा जातो कसा असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरेंवरच आरोप केले आहेत. राणेंच्या ह्या घणाघाती टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.