'आबांचं गृहमंत्रीपदासाठी क्वॉलिफिकेशन काय?'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे कार्यालयाचं उद्घाटन

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2013, 11:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे कार्यालयाचं उद्घाटन आज पार पडलं. या सोहळ्यासाठी खास पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी ३० ऑगस्ट हा ठाण्याचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलाय. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या स्टाईलनं 'मनसे' भाषणही केलंय.
यावेळी राज ठाकरेंनी यासिन भटकळची अटक, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि अंधश्रद्धा अशा सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर भाष्य केलं.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात अजूनही मारेकरी का पकडला गेला नाही, कधी पकडणार मारेकऱ्यांना? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. वटहुकुमासाठी हे सरकार नरबळीची वाट पाहत होतं काय, असं म्हणत सत्तापरिवर्तन हा यावर एकच उपाय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांची नक्कल करत त्यांच्यावर हल्ला चढवला. मेरी झाशी नही छोडूंगी... तसं मी गृहमंत्रीपद सोडणार नाही, अशीच आबांची भूमिका दिसतेय असं म्हणत आर आर पाटील कोणत्या क्वॉलिफिकेशनवर गृहमंत्री पदावर आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हक्काचा मुद्दा म्हणजे मराठी माणूस... मराठी माणसांच्या जमिनी परप्रांतिकयांकडेच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या सभेत पुन्हा एकदा केला. तर ‘दहशतवादी भटकळ कुठे सापडला तर बिहारमध्येच ना?’ या त्यांच्या वाक्यावर त्यांना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
यावेळी राज ठाकरेंनी अंधश्रद्धेवरही जोरदार टीका केली. पूजा करा पण अंधश्रद्धेच्या पाठी निदान तुम्ही तरी लागू नका असा सल्ला मनसे कार्यकर्त्यांना दिला.
व्हि़डिओ पाहा :

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.